IPL 2023 Pitch Report: IPL 2023 चा सीझन सध्या अत्यंत रोमहर्षक वळणावर येऊन पोहोचला आहे. सध्या आयपीएलमधील संघांमध्ये प्लेऑफच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी चुरस पाहायला मिळत आहे. गुजरातनं कालच्या सामन्या हैदराबादचा पराभव करुन प्लेऑफमध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. अशातच आज लखनौ (Lucknow Super Giants) आणि मुंबई (Mumbai Indians) यांच्यात प्लेऑफसाठी अतीतटीची लढत पाहायला मिळणार आहे. 


लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्सचे संघ आमनेसामने असतील. दोन्ही संघ सध्या पॉईंट टेबलमध्ये टॉप 4 मध्ये आहेत, पण आजच्या सामन्यातील एक विजय आणि पराभव बरंच काही बदलू शकतो. चला जाणून घेऊया प्लेऑफच्या शर्यतीचं समीकरण काय  आणि आजच्या सामन्याची खेळपट्टी कशी असेल? 


हेड टू हेड 


आजचा सामना लखनौ सुपर जायंट्सचं होम ग्राउंड असलेल्या एकना स्टेडियमवर होणार आहे. लखनौचा संघ सध्या पॉईंट टेबलमध्ये चौथ्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत 12 सामन्यांपैकी 6 सामने जिंकले आहेत, तर 5 सामने गमावले आहेत, 1 सामना अनिर्णित राहिला आहे, ज्यामुळे त्यांचे 13 गुण आहेत. आणि लखनौच्या वर म्हणजे, मुंबई इंडियन्स आहे, ज्यांनी 12 सामन्यांत 7 सामने जिंकले आहेत, 5 सामने गमावले आहेत आणि 14 गुण आहेत. जर लखनौनं मुंबईला पराभूत केलं तर त्यांचे 15 गुण होतील आणि ते तिसऱ्या क्रमांकावर येतील. पण जर मुंबई जिंकली तर त्यांचे 16 गुण होतील आणि ते चेन्नईला तिसर्‍या स्थानावर नेऊन दुसऱ्या स्थानावर विराजमान होईल. 


लखनौमध्ये दोन्ही संघ पहिल्यांदाच भिडणार 


लखनौच्या एकना स्टेडियमवर पहिल्यांदाच दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. या दोघांमध्ये आतापर्यंत फक्त मुंबईतच सामने झाले आहेत. अशा स्थितीत आज लखनौला घरच्या मैदानाचा फायदा घेता येईल. लखनौनं आजचा सामना गमावला तर ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होतील. त्याचवेळी सामना गमावल्यानंतरही मुंबईला संधी असेल. आता आज कोणता संघ बाजी मारतो हे पाहणे उत्सुकतेचं ठरणार आहे.


लखनौ-मुंबई सामन्याचा खेळपट्टीचा अहवाल कसा असेल? (LSG vs MI Pitch Report)


लखनौ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आजचा सामना लखनौच्या एकना स्पोर्ट्स सिटी स्टेडियमवर होणार आहे. या मैदानावर गोलंदाजांचं वर्चस्व राहिलं असून बहुतांश सामने कमी धावसंख्येचे झाले आहेत. येथे खेळवण्यात येणारा शेवटचा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. आतापर्यंतच्या सामन्याच्या निकालांबद्दल बोलायचं झालं तर, या हंगामात येथे झालेल्या सहा सामन्यांमध्ये यजमान लखनौ सुपर जायंट्सच्या संघानं केवळ तीन सामने जिंकले आहेत. या सामन्यांमध्ये एक सामना अनिर्णित राहिला आणि उर्वरित 5 सामन्यांमध्ये 3 सामने जिंकून सर्वात आधी फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या मैदानावर मोसमातील सर्वोच्च धावसंख्या लखनौ सुपर जायंट्सनं दिल्लीविरुद्धच्या त्यांच्या पहिल्या सामन्यात केली होती, जेव्हा त्यांनी 194 धावांचे लक्ष्य ठेवल्यानंतर 50 धावांनी विजय मिळवला होता, परंतु तेव्हापासून धावसंख्या 160 च्या वर गेली नाही.


IPL 2023 Live Streaming : लाईव्ह सामना कुठे पाहाल?


आयपीएल 2023 (IPL 2023) च्या सर्व सामन्यांचं लाइव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming) 'जिओ सिनेमा' ॲपवर (Jio Cinema) उपलब्ध असेल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण (Live Streaming) केले जाईल. तसेच एबीपी माझाच्या वेबसाईटवरही तुम्हाला सामन्याचे वेळोवेळीचे अपडेट्स उपलब्ध असतील.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


LSG vs MI Playing Eleven: लखनौ-मुंबई यांच्या प्लेऑफची लढाई; कोणाची होणार सरशी?