IPL 2023, KKR vs SRH: कर्णधार नीतीश राणा आणि रिंकू सिंह यांच्या खेळीच्या बळावर कोलकात्याने नऊ विकेटच्या मोबदल्यात १७१ धावांपर्यंत मजल मारली. कोलकात्याची सुरुवात पुन्हा एकदा खराब झाली. रिंकू आणि राणा यांनी कोलकात्याचा डाव सावरला. रिंकूने ४६ तर राणा याने ४२ धावांचे योगदान दिले. हैदराबादसमोर विजायासाठी १७२ धावांचे आव्हान आहे.



रिंकूची पुन्हा फटकेबाजी - 


रिंकू सिंह याने मोक्याच्या क्षणी वादळी फलंदाजी केली. पहिल्यांदा संयमी फलंदाजी केली. त्यानंतर अखेरीस धावा जमवल्या. रिंकू याने ४६ धावांची निर्णायाक खेळी केली. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रिंकू बाद झाला. अब्दुल समद याने जबरदस्त झेल घेतला. रिंकू सिंह याने कर्णधार नीतीश राणा याच्यासमोबत ६१ धावांची महत्वाची भागिदारी केली. त्यानंतर रसेलसोबत झटपट धावा जोडल्या.


नीतीश राणा-रसेलची महत्वाची खेळी -


तीन विकेट झटपट गेल्यानंतर कर्णधार नीतीश राणा याने कोलकात्याचा डाव सावरला. रिंकूच्या मदतीने राणा याने कोलकात्याची धावसंख्या हालती ठेवली. नीतीश राणा याने रिंकूसोबत चौथ्या विकेटसाठी ४० चेंडूत ६१ धावांची भागिदारी केली. राणा बाद झाल्यानंतर रिंकूने रसेलसोबत १८ चेंडूत ३१ धावांची भागिदारी केली. कर्णधार नीतीश राणा याने ३१ चेंडूत ४२ धावांचे योगदान दिले. यामध्ये राणा याने तीन चौकार आणि तीन षटकार लगावले. तर आंद्रे रसेल याने १५ चेंडूत २४ धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याने दोन षटकार आणि एक चौकार लगावला. नीतीश राणा याला हैदराबादच्या कर्णधाराने बाद केले. तर रसेल याला मार्कंडेय याने तंबूचा रस्ता दाखवला.  अनुकूल रॉय याने अखेरीस सात चेंडूत नाबाद १३ धावांची खेळी करत इम्पॅक्ट पाडला. या खेळीत त्याने दोन चौकार लगावले.


यांचा फ्लॉप शो - 


प्रथम फलंदाजी करणाऱ्या कोलकात्याची सुरुवात निराशाजनक झाली. गुरबाज याला खातेही उघडता आले नाही. गुरबाज जानसेनच्या गोलंदाजीवर शून्यावर बाद झाला. त्यानंतर वेंकटेश अय्यर यालाही जानसन याने तंबूचा रस्ता दाखवला. वेकंटेश अय्यर याने चार चेंडूत सात धावांची खेळी केली. दोन विकेटमधून कोलकात्याला सावरताच आले नाही. जेसन रॉय यानेही आपली विकेट फेकली. जेसन रॉय २० धावांवर बाद झाला. जेसन रॉय याने चार चौकाराच्या मदतीने २० धावांची खेळी केली. तीन विकेट झटपट पडल्यानंतर कर्णधार नीतीश राणा आणि रिंकू यांनी डाव सावरला. पण अखेरीस पुन्हा झटपट विकेट गेल्या. सुनील नारायण अवघ्या एका धावेवर बाद झाला. तर शार्दूल ठाकूर याला फक्त आठ धावांचे योगदान देता आले. हर्षित राणा धावबाद झाला... त्याला खातेही उघडता आले नाही. 


हैदराबादचा भेदक मारा - 


हैदराबादच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. पावरप्लेमध्ये कोलकात्याच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. नटराजन २० व्या षटकात फक्त तीन धावा दिल्या. हैदराबादकडून मार्को जानसेन आणि नटराजन यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर भुवनेश्वर कुमार, कार्तिक त्यागी, एडन मार्करम आणि मयांक मार्कंडेय यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.