Orange And Purple Cap In IPL 2023 : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात आतापर्यंत 55 सामने झाले आहेत. आतापर्यंत अनेक खेळाडूंनी आपल्या कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधलेय. पर्पल कॅप कुणाकडे जाणार याची स्पर्धा सर्वाधिक रंगतदार सुरु आहे. तर आरसीबीचा कर्णधार फाफ डु प्लेसिस याने ऑरेंज कॅपवर एकहाती वर्चस्व मिळवलेय. गोलंदाजीचा विचार केला तर तुषार देशपांडे, शमी, राशीद यासह इतर गोलंदाजांमध्ये कडवी टक्कर सुरु आहे. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅपची लढाई अतिशय रंगतदार सुरु आहे. पाहूयात कोण कोण दावेदार आहेत.
ऑरेंज कॅप फाफ डु प्लेसिसकडे, कुणाकडून मिळतेय टक्कर ?
ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत फाफ डु प्लेलिस आघाडीवर आहे. फाफ डु प्लेलिस याने आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. डु प्लेसिस याने 58 च्या सरासरीने आणि 158 च्या स्ट्राईक रेटने 576 धावांचा पाऊस पाडलाय. 500 धावांचा पल्ला पार करणारा डु प्लेसिस एकमेव फलंदाज आहे. या स्पर्धेत दुसऱ्या क्रमांकावर राजस्थानचा यशस्वी जायस्वाल आहे.. त्याने आतापर्यंत 477 धावा केल्या आहेत. म्हणजेच.. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकामध्ये तब्बल 99 धावांचा फरक आहे. आघाडीच्या पाच खेळाडूमध्ये गुजरात टायटन्सचा शुभमन गिल, चेन्नईचा डेवेन कॉनवे आणि विराट कोहली यांचा समावेश आहे. गिल याने आतापर्यंत 469 धावा केल्या आहेत. कॉनवे याने 468 धावा केल्यात. तर विराट कोहली याने 420 धावांचा पाऊस पाडलाय. आयपीएलच्या अखेरीस ऑरेंज कॅप कोण जिंकणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागलेय.
पर्पल कॅपची स्पर्धा रंगतदार -
आरसीबीचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज गेल्या काही सामन्यापासून फ्लॉप जातोय.. त्याचा फटका त्याला बसल्याचे दिसतेय. सिराज पर्पल कॅपच्या स्पर्धेत पिछाडीवर गेलाय. सध्या मोहम्मद शमीकडे पर्पल कॅप आहे. शमीने याने 19 विकेट घेतल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या राशीद खान यानेही 19 विकेट घेतल्या आहेत. आघाडीच्या पाच गोलंदाजात तुषार देशपांडे याचाही समावेश आहे. तुषार देशपांडे याच्या नावावरही 19 विकेट आहेत..पीयुष चावला 17 विकेटसह चौथ्या क्रमांकावर आहे तर वरुण चक्रवर्तीही 17 विकेटसह पाचव्या क्रमांकावर आहे.
चेन्नई आणि गुजरात मजबूत स्थितीत -
चेन्नई आणि गुजरात गुणतालिकेत मजबूत स्थितीत आहेत. 16 गुणांसह गुजरात पहिल्या क्रमांकावर आहे तर 15 गुणांसह चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर आहे. दोन्ही संघाचा नेटरनरेटही चांगला आहे. दोन्ही संघाचे प्लेऑफमधील स्थान जवळपास निश्चित मानले जातेय. गुजरातने 11 सामन्यात 16 गुणांची कमाई केली आहे तर चेन्नई 12 सामन्यात 15 गुणांची कमाई केली आहे. चेन्नईचे आणखी दोन सामने बाकी आहेत.. तर गुजरातचे तीन सामने शिल्लक आहेत.. त्यामुळे या दोन्ही संघाचा प्रवेश निश्चित मानला जातोय. मुंबईने आरसीबीचा पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेफ घेतली आहे. वानखेडेवर मुंबईने आरसीबीचा दारुण पराभव केला होता. हा मुंबईचा सहावा विजय होता. 12 गुणांसह मुंबई तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर लखनौ 11 सामन्यात 11 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
आणखी वाचा :
IPL 2023 Points Table : चेन्नईची प्लेऑफच्या दिशेने आगेकूच, दिल्लीचे आव्हान संपले, पाहा गुणतालिकेची स्थिती
IPL 2023 : दिल्लीचा IPL मधील गाशा गुंडाळला, पराभवाची कारणे काय?