Yash Dhull IPL Debut : टीम इंडियाला अंडर-19 चा विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार यश धुल याला दिल्लीच्या संघात संधी देण्यात आली आहे. डेविड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील दिल्ली संघात यश धुल याला स्थान देण्यात आलेय. दिल्लीला पहिल्या तिन्ही सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला होता. दिल्लीची फलंदाजी कमकुवत होती. यश धुल याच्या समावेशामुळे दिल्लीची फलंदाजी कितपत मजबुत होतो, हा येणारी वेळच सांगेल. 


दिल्ली कॅपिटल्सने यश धुल याला 2022 च्या आयपीएल लिलावात 50 लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. गेल्या हंगामात यश धुल याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. यश धुल याने देशांतर्गत क्रिकेटमध्येही चमकदार कामगिरी केली आहे. आतापर्यंत तो आठ टी 20 सामन्यात खेळला आहे.  या सामन्यात त्याने 72 च्या सरासरीने आणि 131 च्या स्ट्राईक रेटने 363 धावांचा पाऊस पाडला. दिल्लीच्या संघात आज पदार्पण करणारा यश धुल नेमका कोण आहे? भारताच्या अंडर-19 संघाचा कर्णधारापर्यंत पोहचण्यासाठी त्याला किती संघर्ष करावा लागलाय? त्याच्या यशामागं कोण आहे? याबद्दल जाणून घेऊयात. 


यश धुल हा मूळचा दिल्लीचा आहे. यशचे वडील विजय धूल यांनी आपल्या मुलाचे क्रिकेट करिअर घडवण्यासाठी नोकरी सोडली हेती. सैन्यात असलेल्या विजय यांच्या वडिलांच्या पेन्शनमुळं कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. त्यांच्या मुलाला उत्कृष्ट क्रिकेटपटू बनण्याच्या प्रवासाबद्दल बोलताना विजय यांनी त्यावेळी टाईम्स ऑफ इंडियानं सांगितलं होतं की, "यशला लहानपणापासूनच खेळण्यासाठी सर्वोत्तम किट आणि गियर मिळतील, याची आम्ही काळजी घेतली. मी त्याला सर्वोत्तम इंग्रजी विलो बॅट्स दिल्या. त्याच्याकडे फक्त एकच बॅट नव्हती. मी बॅट अपग्रेड करत राहिलो आणि आम्ही आमच्या खर्चात कपात केली."  






दिल्ली कुठे ठरतेय कमकुवत -


2022 च्या अखेरीस ऋषभ पंतचा भीषण अपघात झाला होता, यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे तो आयपीएलच्या संपूर्ण हंगामाला मुकलाय. पंतच्या अनुपस्थितीत दिल्लीचा मध्यक्रम कमकुवत जाणवतोय. त्याशिवाय विकेटकिपर म्हणून पहिल्या सामन्यात सरफराज खानला उतरवले होते तर दोन सामन्यात पोरेल याला स्थान दिले होते. पण पोरेल याच्याकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव कमी आहे. सरफराज देशांतर्गत क्रिकेटमध्ये विकेटकीपिंग करत नाही. दिल्लीला तिन्ही सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. लखनौ, गुजरात आणि राजस्थान या संघांनी दिल्लीचा मोठ्या फरकाने पराभव केला होता. डेविड वॉर्नर फलंदाजीत धावा काढतोय, पण त्याला दुसऱ्या बाजूने साथ मिळत नाही. वॉर्नर याचा स्ट्राइक रेटही कमीच आहे. वॉर्नर याने तीन सामन्यात 158 धावा चोपल्या आहेत, यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट फक्त 117 इतकाच राहिलाय. पृथ्वी शॉ दोन्ही तिन्ही सामन्यात फ्लॉप गेलाय. त्याला फक्त 19 धावा काढता आल्यात. सरफराज, मिशेल मार्श, रोवमन पॉवेल, रायली रुसो, ललित यादव, मनिष पांडे आणि हकीम खान यासारखे फलंदाज अपयशी ठरत आहेत. दिल्लीला विजय मिळवायचा असेल तर फलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. दिल्लीच्या गोलंदाजीतही धार दिसत नाही. खलील अहमद, मुकेश कुमार, चेतन सकारिया, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांना अद्याप लय मिळालेली नाही. एनरिक नॉर्खिया यालाही दोन सामन्यात चांगली कामगिरी करता आलेली नाही.