KKR vs CSK, IPL 2023 : ईडन गार्डन्सच्या मैदानावर झालेल्या सामन्यात चेन्नईने कोलकात्याचा ४९ धावांनी सहज पराभव केला. चेन्नईने दिलेल्या २३६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याचा संघ आठ विकेटच्या मोबदल्यात १८६ धावांपर्यंत मजल मारु शकला. जेसन रॉय आणि रिंकू सिंह यांनी अर्धशतकी खेळी केली, पण ते संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. चेन्नईकडून तुषार देशपांडे आणि महिश तिक्ष्णा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या.  दरम्यान, प्रथम फलंदाजी करताना अजिंक्य राहणे, डेवेन कॉनवे आणि शिवम दुबे यांच्या अर्धशतकाच्या बळावर चेन्नईने २३५ धावांचा डोंगर उभारला होता.


चेन्नईने दिलेल्या २३६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकात्याची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्या दोन षटकात दोन फलंदाज तंबूत परतले. सुनील नारायण पहिल्याच षटकात बाद झाला तर नारायण जगदीशन दुसऱ्या षटकात बाद झाला. सुनील नारायण याला शून्यावर आकाश सिंह याने बाद केले तर नारायण जगदीशन याला एका धावेवर तुषार देशपांडे याने बाद केले. दोन विकेट झटपट बाद झाल्यानंतर कोलकात्याला वेंकटेश अय्यर आणि कर्णधार नीतीश राणा यांनी सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनी झटपाट धावा करण्याचा प्रयत्न केला. पण वेंकटेश अय्यरला २० धावांवर मोईन अलीने तंबूत पाठवले. त्यानंतर नीतीश राणा याला जाडेजाने बाद करत कोलकात्याला मोठा धक्का दिला. नीतीश राणा याने २७ धावांचे योगदान दिले.


७० धावात चार विकेट गमावल्यानंतर कोलकाता मोठ्या फरकाने सामना गमावणार असे वाटत होते. पण त्याचवेळी जेसन रॉय आणि रिंकू सिंह यांनी चेन्नईच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. जेसन रॉय याने मैदानाच्या चारी बाजूने फटकेबाजी केली. जेसन रॉय याने २६ चेंडूत ६१ धावांची वादळी खेळी केली. जेसन रॉय याने आपल्या वादळी खेळीत पाच षटकार आणि पाच चौकारांचा पाऊस पाडला. महिश तिक्ष्णा याने जेसन रॉय याला बाद करत कोलकात्याच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आणल्या. जेसन रॉय बाद झाल्यानंतर कोलकात्याची फलंदाजी पुन्हा एकदा ढेपाळली. आंद्रे रसेल अवघ्या नऊ धावांवर बाद झाला. पथीराणा याने रसेल याला दुबेकरवी झेलबाद केले. डेविड विजा याला एक धावावर तुषार देशपांडेने बाद केले. त्यानंतर उमेश यादव याला महिश तिक्ष्णा याने तंबूत पाठवले. उमेश यादव याने चार धावांचे योगदान दिले. रिंकू सिंह याने अखेरपर्यंत एकाकी झुंज दिली. रिंकू सिंह याने दमदार अर्धशतकी खेळी केली. पण रिंकू सिंह याने नाबाद ५३ धावांची खेळी केली. या खेळीत रिंदू सिंह याने चार षटकार आणि तीन चौकार लगावले. 


चेन्नईकडून सर्वच गोलंदाजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. तुषार देशपांडे, महिश तिक्ष्णा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर आकाश सिंह, मोईन अली, रविंद्र जाडेजा आणि पथिराणा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.