IPL 2023, Punjab Kings : आगामी आयपीएल (IPL 2023) स्पर्धेपूर्वी पंजाब किंग्जला (Punjab Kings) संघाला मोठा धक्का बसू शकतो. कारण संघाचा स्टार फलंदाज जॉनी बेअरस्टोच्या (Jonny bairstow) यंदाच्या हंगामात खेळेल का? याबाबत संभ्रम आहे. इंडियन प्रीमियर लीगचा 16वा सीझन जवळपास तीन आठवड्यांनंतर सुरू होत आहे. त्याचवेळी पंजाब किंग्जचा फलंदाज जॉनी बेअरस्टो इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून (ECB) वैद्यकीय मंजुरीची वाट पाहत आहे. कारण इंग्लंड क्रिकेट संघाचा हा यष्टिरक्षक फलंदाज गेल्या वर्षी झालेल्या दुखापतीतून अजूनही सावरत आहे. अलीकडेच बेअरस्टोने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे ज्यामध्ये तो सराव करताना दिसत आहे.
गोल्फ खेळताना दुखापत झाली
जॉनी बेअरस्टो गेल्या वर्षी 2 सप्टेंबरला जखमी झाला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या काही दिवसांपूर्वी बेअरस्टोला दुखापत झाली होती. त्यादरम्यान यॉर्कशायरमध्ये मित्रांसोबत गोल्फ खेळताना तो घसरला होता. त्यामुळे त्यांचा डावा पाय मोडला. याशिवाय त्याच्या घोट्यालाही दुखापत झाली. दुखापतीनंतर त्याच्यावर लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आणि त्याच्या लिगामेंटवरही उपचार करण्यात आले.
सात महिने क्रिकेटपासून दूर
जॉनी बेअरस्टो जवळपास सात महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये दुखापत झाल्यापासून तो इंग्लंडकडून कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळलेला नाही. 2022 साली ऑस्ट्रेलियात झालेल्या T20 विश्वचषकादरम्यान तो इंग्लिश संघाचा भाग नव्हता. याशिवाय पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड आणि बांगलादेश दौऱ्यालाही तो मुकला होता. त्याच वेळी, तो अबू धाबी नाइट रायडर्स संघाचा भाग असलेल्या ILT20 लीगमध्ये खेळू शकला नाही.
पंजाब किंग्ज बेअरस्टोच्या संपर्कात
यापूर्वी, ईसीबीने संकेत दिले होते की जॉनी बेअरस्टो 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल 2023 मध्ये पुनरागमन करू शकतो. पंजाब किंग्जचे वैद्यकीय कर्मचारी बेअरस्टोच्या सतत संपर्कात आहेत आणि ते बरे होण्याची आशा करत आहेत. आयपीएलसाठी बेअरस्टोची उपलब्धता, त्याची वर्कलोड क्षमता आणि तो पूर्ण किंवा अंशतः उपलब्ध असेल का? पंजाब किंग्स या संदर्भात ईसीबीच्या उत्तराची वाट पाहत आहे.
31 मार्चपासून सुरु होणार IPL 2023
बीसीसीआयने आयपीएलच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर केले आहे. 31 मार्च ते 28 मे यादरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे. गतविजेते गुजरात आणि चेन्नई यांच्यात पहिला सामना होणार आहे. 21 मेपर्यंत लीग सामने होणार आहेत. त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने रंगणार आहेत. तर 28 मे रोजी फायनलचा थरार पाहायला मिळेल. आयपीएल 2023 मध्ये एकूण 74 सामने होणार आहेत. लीग राऊंडमध्ये दहा संघ प्रत्येकी 14-14 सामने खेळणार आहे. याप्रमाणे 10 संघामध्ये 70 सामने होणार आहेत. त्यानंतर प्लेऑफचे चार सामने होणार आहेत. 28 मे रोजी फायनलचा थरार रंगणार आहे. आयपीएल 2023 चं आयोजन भारतातच होणार आहे. देशभरातील 12 मैदानावर सामने रंगणार आहेत. दहा संघांना दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. अ ग्रुपमध्ये मुंबई, राज्यस्थान, दिल्ली आणि लखनौ संघाचा सहभाग आहे. तर ब गटामध्ये चेन्नई, पंजाब, हैदराबाद, आरसीबी आणि गुजरात या संघाचा समावेश आहे.
हे देखील वाचा-