IPL Auction 2023 : क्रिकेट जगतातील सर्वात प्रसिद्ध लीग अर्थात इंडियन प्रिमीयर लीग (IPL) स्पर्धेच्या आगामी हंगामासाठी आज अर्थात 23 डिसेंबर रोजी कोची येथे लिलाव पार पडणार आहे. दरम्यान आयपीएलच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज अष्टपैलू ख्रिस मॉरिस (Chri Morris) सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. राजस्थान रॉयल्सने त्याला 2021 मध्ये 16.25 कोटींना खरेदी केले होते. पण यंदा हा विक्रम मोडण्यासाठी चार खेळाडू सज्ज झाले आहेत. विशेष बाब म्हणजे या चार खेळाडूंपैकी तीन खेळाडू इंग्लंडचे आहेत.


यंदा विविध संघांकडे मिळून 206.5 कोटी इतकी रक्कम आहे. पण सर्वांकडे मिळून तब्बल 87 स्थानंही रिकामी आहेत. अशा परिस्थितीत ख्रिस मॉरिसचा विक्रम मोडणं सोपं नाही, कारण अधिक पैसे असले तरी तितकेच खेळाडूही संघाना विकत घ्यायचे आहेत. तरी एकंदरीत विचार केला असता कोणत्या खेळाडूंवर सर्वाधिक बोली लागू शकते ते पाहूया...


1. बेन स्टोक्स : इंग्लंडला टी20 विश्वचषक 2022 ची फायनल जिंकण्यात मोठा वाटा असणारा बेन स्टोक्स (Ben Stokes) यंदाच्या लिलावात सर्वात महागडा खेळाडू ठरू शकतो. फलंदाजी आणि गोलंदाजीसोबतच तो एक चांगला कर्णधारही आहे. अशा स्थितीत एका चांगल्या कर्णधाराची नितांत गरज असलेल्या सनरायझर्स हैदराबादसारख्या संघाला त्याच्यावर बाजी मारता येईल.


2. सॅम करन : टी विश्वचषक 2022 चा 'प्लेअर ऑफ द सीरीज' ठरलेला इंग्लंडचा सॅम करन याच्यासाठीही अनेक फ्रँचायझीची नजर आहे. तो डावखुरा वेगवान गोलंदाज आहे आणि क्रिकेटमध्ये डाव्या हाताच्या गोलंदाजांना मोठी मागणी असते. यासोबत तो खालच्या ऑर्डरमध्येही चांगली फलंदाजी करू शकतो. हेच कारण आहे की पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्ससारखे संघ करनसाठी कोट्यवधी खर्च करु शकतात.


3. हॅरी ब्रुक : इंग्लंडच्या या युवा डॅशिंग फलंदाजाने यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. आपल्या छोट्या कारकिर्दीत देखील तो कमालीचा प्रभावी ठरला आहे. अलीकडेच, पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी क्रिकेटमध्येही त्याने वेगवान पद्धतीनं तीन शतकं झळकावली आहेत. अनेक संघांना त्यांच्या मधल्या फळीत अशा दमदार फलंदाजीची गरज असते. दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्जसारखे संघ हॅरीवर मोठी बोली लावू शकतात.


4. कॅमेरुन ग्रीन : या ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडूसाठी यंदा विविध संघांमध्ये चुरशीची लढत रंगणार आहे. जुलैमध्ये भारताच्या दौऱ्यावर कॅमेरून ग्रीनने ज्या प्रकारे धडाकेबाज फलंदाजी केली, तेव्हापासून आयपीएलमध्ये तो मोठ्या किमतीला विकला जाण्याच्या चर्चा होत्या. सलामीवीर म्हणून तो संघाला एक चांगली सुरुवात देऊ शकतो, तसेच तो गोलंदाजीतही चांगला पर्याय आहे. त्याला विकत घेण्यासाठी पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यात चुरस असे.


हे देखील वाचा-