Yuzvendra Chahal Record Rajasthan Royals IPL 2022 : राजस्थान रॉयल्सचा फिरकीपटू गोलंदाज युजवेंद्र चहलने आयपीएलच्या यंदाच्या हंगामात दमदार कामगिरी केली. साखळी सामन्यात चहलने आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. चहलने चौदा सामन्यात 26 विकेट घेतल्या आहेत. पर्पल कॅपही चहलच्या डोक्यावर आहे. राजस्थान रॉयल्सने यंदा चहलला  6.50 कोटी रुपयांमध्ये संघात घेतले होते. याआधी चहल आरसीबी संघाचा भाग होता. यंदाच्या हंगामात चहलने अधिक भेदक मारा करत पर्पल कॅपवर कब्जा केला आहे. यासोबत दिग्गज फिरकीपटू हरभजन सिंहचा विक्रमही मोडीत काढलाय.  


युजवेंद्र चहलने आतापर्यंत 14 सामन्यात  26 विकेट घेतल्या आहेत. 40 धावांच्या मोबदल्यात पाच विकेट ही त्याची यंदाची सर्वोत्कृष्ट कामगिरी होय. यंदाच्या हंगामात चहलने एकदा चार आणि पाच विकेट घेण्याचा पराक्रमही केलाय. चहलच्या भेदक माऱ्याच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने प्लेऑफमध्ये प्रवेश केलाय. चहलने यंदाच्या हंगामात 26 विकेट घेण्याचा कारनामा केलाय. भज्जीचा विक्रम मोडला आहे. याआधी आयपीएलमध्ये एका हंगामात सर्वाधिक विकेट घेण्याचा मान भज्जीच्या नावावर होता. भज्जीने आयपीएल 2013 मध्ये 24 विकेट घेतल्या होत्या. यजुवेंद्र चाहलने हा विक्रम मोडीत काढलाय.  


दरम्यान, संजू सॅमसनच्या नेतृत्वातील राजस्थान रॉयल्सने यंदा दमदार कामगिरी केली आहे. राजस्थान संघाने 14 साखळी सामन्यापैकी 9 सामन्यात विजय मिळवलाय. तर पाच सामन्यात पराभवाचा सामना केलाय. राजस्थानचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे.  राजस्थान आणि लखनौ या दोन्ही संघाचे समान गुण आहे. मात्र सरस नेटरनरेटच्या जोरावर राजस्थानने दुसऱ्या क्रमांकावर कब्जा केला आहे. कोलकातामध्ये राजस्थान आणि गुजरात यांच्यामध्ये पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. 


हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात हैदराबादच्या संघान 14 पैकी 10 सामन्यात विजय मिळवला आहे. तर, 20 गुणांसह (+0.316) गुजरातचा संघ आयपीएलच्या गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. आयपीएल 2022 च्या प्लेऑमध्ये गुजरात, राजस्थान, लखनौ सुपर जायंट्सचं स्थान निश्चित झालं आहे. राजस्थानचे 9 सामने जिंकून 18 गुण (+0.298)  झाले आहेत. त्यानंतर लखनौचा संघ 18 गुणांसह (+0.251) तिसऱ्या क्रमांकावर आहे. सध्या चौथ्या क्रमांकासाठी बंगळुरू आणि दिल्ली यांच्यात स्पर्धा सुरू आहे. बगंळुरूचे 16 गुण आहेत. तर, दिल्लीचे 14 गुण आहेत. दिल्लीला या हंगामातील त्यांचा अखेरचा सामना खेळायचा आहे. या सामन्यात दिल्लीनं विजय मिळवल्यास त्यांचे 16 गुण होतील. जर दोन्ही संघाची तुलना केल्यास दिल्लीचा रनरेट बंगळुरू पेक्षा चांगला आहे.