RR vs GT, IPL 2022 Final : आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेचा अंतिम सामना सात विकेट्सनी जिंकत गुजरातनं आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. त्यांनी राजस्थान रॉयल्सला मात दिल्यामुळे 14 वर्षानंतर पुन्हा एकदा चॅम्पियन होण्याचं राजस्थानचं स्वप्न धुळीस मिळालं आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) खेळवल्य़ा गेलेल्या या सामन्यात नाणेफेक जिंकत राजस्थानने फलंदाजी घेतली. त्यांनी 20 षटकात 9 गडी गमावत 130 धावाच केल्या. ज्या 18.1 षटकातच गुजरातने पूर्ण करत सामन्यासह स्पर्धाही जिंकली. गुजरातकडून शुभमनने सर्वाधिक नाबाद 45 धावांची तुफान खेळी केली.
नाणेफेक जिंकत राजस्थानच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय़ घेतला. एक मोठी धावसंख्या करुन गुजरातवर दबाव टाकण्याचा निर्धार राजस्थानने केला असावा, पण गुजरातच्या भेदक गोलंदाजीमुळे राजस्थानचा हा निर्णय़ पुरता फसला. संघाची ठिक-ठाक झालेली सुरुवात नंतर मात्र संपूर्णपणे ढासळली. सलामीवीर यशस्वी आणि बटलर क्रिजवर असताना एक मोठी धावसंख्या होईल असं वाटतं होतं. यशस्वी फटकेबाजी देखील करत होता. पण 22 धावा करुन तो बाद झाल्यानंतर मात्र राजस्थानचा डाव धीमा झाला. यशने ही विकेट घेतली होती. त्यानंतर कर्णधार संजू बटलर सोबत डाव सांभाळत असतानाच गुजरातचा कर्णधार हार्दिकने संजूला बाद केलं. ज्यानंतर काही वेळातच पडिक्कलही बाद झाला. पण बटलर क्रिजवर असल्यामुळे सर्वांना आशा होती, पण पांड्याने आणखी एक दमदार चेंडूवर बटलरलाही तंबूत धाडलं. ज्यानंतर मात्र एकाही फलंदाजाला टिकून खेळता आलं नाही. बटलरच्या 39 धावा सर्वाधिक राहिल्या. हिटमायर आणि बोल्ट यांनी प्रत्येकी 11 तर रियानने 15 धावांची खेळी केली. संपूर्ण संघ मिळून केवळ 130 धावाच करु शकला.
शुभमनची संयमी खेळी आणि गुजरात विजयी
131 धावांच्या माफक आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात खराब झाली. साह स्वस्तात माघारी परतला. नंतर वेडही 8 धावा करुन बाद झाला. पण त्यानंतर हार्दिकने शुभमनसह डाव सावरला आणि तुफान खेळी करत संघाची धावसंख्या पुढे नेली. 30 चेंडूत 34 धावा करत हार्दिकने संघाला विजयाजवळ नेलं, हार्दिक बाद होताच मिलरने 32 धावांची तुफान खेळी करत विजय पक्का केला. पण शुभमनने अखेरेच्या चेंडूवर षटकार ठोकत विजयश्री संघाला मिळवून दिला. त्याच्या नाबाद 45 धावा संघासाठी महत्त्वाच्या ठरल्या.
हार्दिक सामनावीर
सामन्यात विजयी संघाचा कर्णधार हार्दिकला सामनावीर पुरस्कार मिळाला त्याने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्हीमध्ये कमाल कामगिरी केली. गुजरात संघाच्या सर्वच खेळाडूंनी कमाल गोलंदाजी केली. पण कर्णधार हार्दिक पांड्याने मात्र सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत महत्त्वपूर्ण तीन विकेट्स घेतल्या. पांड्याने 4 षटकात 17 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. यात संजू, बटलर आणि हेटमायर या महत्त्वाच्या विकेट्स होत्या. याशिवाय त्याने फलंदाजीत 30 चेंडूत 34 धावा केल्या. ज्यामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
हे देखील वाचा-