Kane Williamson Sunrisers Hyderabad IPL 2022 : केन विल्यमसनच्या नेतृत्वातील सनराइजर्स हैदराबाद संघाचे यंदाच्या हंगामातील आव्हान संपुष्टात आलेय. हैदराबादचा अखेरचा साखळी सामना रविवारी खेळवण्या येणार आहे. पंजाब आणि हैदराबाद यांच्यादरम्यान अखेरचा साखळी सामना होणार आहे. हे दोन्ही संघाचे आव्हान संपुष्टात आलेय. हैदराबादने यंदाच्या हंगामात आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. यामध्ये सहा सामन्यात त्यांना विजय मिळवता आलाय. तर सात सामन्यात पराभवाचा सामना करावा लागलाय. हैदराबादचा संघ गुणतालिकेत आठव्या क्रमांकावर आहे.  हैदराबाद संघाने दणक्यात सुरुवात केली होती. मात्र अखेरच्या काही सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादचा संघाचे आव्हान संपुष्टात येण्यामागे अनेक कारणे आहेत. यामधील फलंदाजांची खराब कामगिरी हे एक कारण आहे. विल्यमसनसह एकाही फलंदाला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. राहुल त्रिपाठीने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला.. पण त्याला तितके यश आले नाही. 


 हैदराबाद संघातील आघाडीच्या फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार केन विल्यमसनलाही अपयश आले. विल्यमसनने यंदाच्या हंगामात फक्त एक अर्धशतक लगावले आहे. विल्यमसनने 13 सामन्यात फक्त 216 धावा केल्या आहेत. त्याची सर्वोत्कृष्ट केली 57 इतकी आहे. हैदराबादकडून राहुल त्रिपाठीने सर्वाधिक धावा चोपल्या आहेत. राहुलने 393 धावा केल्या आहेत. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या पहिल्या दहा खेळाडूंमध्ये हैदराबादच्या एकाही फलंदाजाचे नाव नाही. अकराव्या क्रमांकावर राहुल त्रिपाठी आहे. तर  अभिषेक शर्मा 13व्या नंबरवर आहे. अभिषेक शर्माने 13 सामन्यात 383 धावा केल्या आहेत.  


गोलंदाजीतही हैदराबादचा संघ प्रभावी राहिला नाही. अनुभवी भुवनेश्वर कुमार याच्या गोलंदाजीत धार दिसून आली नाही. हैदराबादकडून सर्वाधिक विकेट उमरान मलिकने घेतल्या आहेत.  उमरान मलिकने 13 सामन्यात 21 विकेट घेतल्या आहेत. पण तो महागडा ठरलाय. नटराजनही दुखापतीमुळे सर्व सामने खेळू शकला नाही... भुवनेश्वर कुमारने 13 सामन्यात 12 विकेट घेतल्या आहेत.