IPL 2022 : आयपीएलच्या रणसंग्रामाला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. चाहते आयपीएलच्या उत्सुकतेने वाट पाहत आहेत. प्रत्येकजण आपल्या संघाला सपोर्ट करत आहे. ऑफिसपासून रेल्वे, बस आणि कॉलेजच्या कट्ट्यावर आयपीएलचीच चर्चा सुरु आहे. यंदा आयपीएल कोण जिंकणार? या प्रश्नाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. अशातच भारताचे दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी यंदा आयपीएल कोण जिंकणार, याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच कोणत्या संघाची कामगिरी निराशाजनक असेल, तेही सांगितलं आहे.
26 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यामध्ये आयपीएलचा सलामीचा सामना होणार आहे. त्यापूर्वी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. आयपीएलमधील दहा संघांनीही कंबर कसली आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने तयारी करत आहे. 14 वर्षात तीन संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलचा चषक उंचावता आलेला नाही. यामध्ये आरसीबी, पंजाब आणि दिल्ली या संघाचा समावेश आहे. यामध्ये आता लखनौ आणि गुजरात या दोन संघाचा समावेश झाला आहे. म्हणजेच पाच संघांनी आयपीएलवर नाव कोरलं आहे. दिग्गज माजी खेळाडू सुनील गावस्कर यांनी यंदाच्या आयपीएलबाबत आपला अंदाज व्यक्त केला आहे. एका कार्यक्रमात बोलताना गावस्कर यांनी दिल्ली यंदा आयपीएल चषकावर नाव कोरेल असा अंदाज वर्तवला आहे. ते म्हणाले की, ‘लिलावात दिल्लीने विचारपूर्वक पैसा खर्च केला आहे. यंदा ऋषभ पंत याच्या नेतृत्वात दिल्लीचा संघ पहिल्यांदा आयपीएलचा चषक उंचावेल. तर पंजाब किंग्स संघाकडून कोणतीही आपेक्षा नाही. पंजाब संघाची कामगिरी निराशाजनक होऊ शकते. काही सामन्यात पंजाबचा संघ चमकू शकतो, मात्र चषकावर नाव कोरण्याची शक्यता कमीच आहे. ‘
दिल्ली विजयाचा प्रबळ दावेदार -
गतवर्षी केलेल्या नेतृत्वामुळे ऋषभ पंतकडे अनुभव वाढला आहे. तो अनुभव यंदा पंतला कामाला येऊ शकतो. मागील काही दिवासांपासून पंतची कामगिरी सुधारली आहे. त्याच्यात आत्मविश्वास प्रंचड वाढला आहे. याचा फायदा दिल्लीच्या संघाला नक्कीच होईल. तसेच लिलावात दिल्ली संघाने दर्जेदार खेळाडूंना सामील केलं आहे. प्रत्येक खेळाडूचा पर्यायी खेळाडू उपलब्ध आहे. त्यामुळे दिल्ली यंदा विजयाची प्रबळ दावेदार आहे. ‘
पंजाबमध्ये खास खेळाडूंचा तुटवडा –
पंजाब संघाकडे खास आणि दर्जेदार खेळाडूंचा तुटवडा असल्याचे दिसतेय. लिलावातही पंजाबने खरेदी केलेले खेळाडू तितकेसे प्रभावी नाहीत. त्यामुळे संघाची कामगिरी तितकीशी चांगली होईल, असे वाटत नाही. संघात मॅचविनर खेळाडूंची कमतरता आहे. त्यामुळेच पंजाब किंग्स संघाकडून कोणतीही आपेक्षा नाही. पंजाब संघाची कामगिरी निराशाजनक होऊ शकते. काही सामन्यात पंजाबचा संघ चमकू शकतो, मात्र चषकावर नाव कोरण्याची शक्यता कमीच आहे.
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live