IPL 2022, SRH vs RR  : कर्णधार संजू सॅमसन, देवदत्त पड्डिकल आणि शिमरोन हेटमायर यांच्या विस्फोटक फंलदाजीच्या जोरावर राजस्थान संघाने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 210 धावा केल्या आहेत. हैदराबाद संघाला विजयासाठी 211 धावांचे आव्हान देण्यात आले आहे. राजस्थान संघाने यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली आहे. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमनस याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, राजस्थानच्या फलंदाजांनी हैदराबादच्या गोलंदाजांची पिसे काढली. राजस्थान संघाने प्रथम फंलदाजी करताना 20 षटकात 210 धावांपर्यंत मजल मारली आहे. हैदराबादकडून उमरान मलिक आणि नटराजन यांना दोन विकेट मिळाल्या. तर शेफर्ड आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. 


दमदार सुरुवात – 
नाणेफेक गमावल्यानंतर राजस्थान संघाने दमदार सुरुवात केली. यशस्वी जयस्वाल आणि बटलरने धावांचा पाऊस पाडला. दोघांनी 41 चेंडूत 58 धावांची सलामी दिली. जॉस बटलरने 28 चेंडूत 25 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान बटलरने तीन चौकार आणि तीन षटकार लगावले. जयस्वाल याने 16 चेंडूत 20 धावांची खेळी केली. 


संजूची विस्फोटक फलंदाजी – 
संजू सॅमसन याने कर्णधारपदाला साजेशी फलंदाजी केली. संजू सॅमसन याने विस्फोटक फलंदाजी करत संघाची धावसंख्या वाढवली. संजूने 27 चेंडूत 55 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान संजूने पाच गगनचुंबी षटकार लगावले तर तीन चौका लगावले. 


संजू-पड्डीकलची भागिदारी – 
जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांच्या दमदार सुरुवातीनंतर कर्णधार संजू सॅमसन आणि देवदत्त पड्डिकल यांनी महत्वाची भागिदारी केली. दोघांनी विस्फोटक अंदाजात फलंदाजी केली. पड्डीकलने 29 चेंडूत 41 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान पड्डिकलने दोन षटकार आणि चार चौकार लगावले. संजू आणि पड्डिकल यांनी 41 चेंडूत 73 धावांची भागिदारी केली. 


हेटमायरचा फिनिशंग टच – 
कर्णधार संजू सॅमसन बाद झाल्यानंतर सर्व सुत्रे शेमरॉन हेटमायर याने आपल्याकडे घेतली. हेटमायरने अखेरच्या षटकात धावांचा पाऊस पाडला. हेटमायरने अवघ्या 13 चेंडूत 33 धावांचा पाऊस पाडला. या खेळीदरम्यान हेटमायरने 3 षटकार आणि दोन चौकार लगावले.