RCB vs GT, IPL 2022 : विराट कोहलीच्या वादळी अर्धशतकाच्या बळावर आरसीबीने गुजरातचा आठ गड्याने पराभव केलाय. विराट कोहलीने करो या मरोच्या लढतीत वादळी 73 धावांची खेळी केली. गुजरातने दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा आरसीबीने 18.4 षटकांत दोन गड्यांच्या मोबदल्यात यशस्वी पाठलाग केलाय. या विजयासह आरसीबीने प्लेऑफमधील आव्हान जिवंत ठेवलेय. 16 गुणांसह आरसीबी गुणतालिकेत चौथ्या क्रमांकावर पोहचलाय. दिल्ली आणि मुंबई यांच्यादरम्यान 21 तारखेला होणाऱ्या सामन्यानंतर प्लेऑफचं गणित ठरणार आहे. आरसीबीच्या विजयानंतर पंजाब आणि हैदराबाद यांचे यंदाच्या आयपीएलमधील आव्हान संपले आहे. 


फाफ-विराटची वादळी सुरुवात -  
गुजरातने दिलेल्या 168 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आजी-माजी कर्णधारांनी दमदार सुरुवात केली. विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी 115 धावांची सलामी दिली. गुजरातने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना विराट कोहली आणि फाफ डु प्लेसिस यांनी भक्कम पाया रचला. फाफ डु प्लेसिस 44 धावा काढून माघारी परतला. डु प्लेसिसने 38 चेंडूत 44 धावांची खेळी केली. 


विराट कोहलीची वादळी खेळी - 
यंदाच्या हंगामात पहिल्या 13 सामन्यात विराट कोहलीला आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. पण साखळी सामन्याच्या अखेरच्या सामन्यात विराट कोहलीने वादळी खेळी केली. विराट कोहलीने 54 चेंडूत 73 धावांची खेळी केली. विराट कोहलीने या खेळीदरम्यान आठ चौकार आणि दोन षटकार लगावले. 


मॅक्सवेलचा फिनिशिंग टच - 
फाफ डु प्लेसिस आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने सर्व सुत्रे आपल्या घेत गुजरातच्या गोलंदाजांची धुलाई केली. मॅक्सवेलने फिनिशिंग टच देताना 18 चेंडूत 40 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान मॅक्सवेलने दोन षटकार आणि पाच चौकार लगावले. 


राशिदचा अपवाद वगळता इतर गोलंदाज अपयशी - 
गुजरातकडून राशिद खानचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही. गुजरातकडून राशिद खान याने दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय इतर गोलंदाजांची विकेटची पाटी कोरीच राहिली. 


हार्दिक पांड्याची कर्णधाराला साजेशी खेळी -
गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हार्दिक पांड्याच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात 168 धावा केल्या. प्रथम फलंदाजी करताना गुजरातची सुरुवात निराशाजनक झाली. फॉर्मात असलेला शुभमन गिल अवघ्या एका धावेवर माघारी परतला. त्यानंतर मॅथ्यू वेडही 16 धावा काढून बाद झाला. वृद्धीमान साहा 31 धावांवर धावबाद झाला. गुजरातची फलंदाजी ढासळत असताना हार्दिक पांड्याने कर्णधाराला साजेशी फलंदाजी केली. हार्दिक पांड्याने पहिल्यांदा डेविड मिलरच्या साथीने डाव सावरला. मिलर 25 चेंडूत 34 धावा काढून बाद झाला. मिलरनंतर तेवातियाही दोन धावा काढून माघारी परतला. त्यानंतर हार्दिक पांड्याने राशिद खानच्या मदतीने चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. हार्दिक पांड्याने नाबाद 62 धावांची खेळी केली. तर राशिद खान याने सहा चेंडूत नाबाद 19 धावा केल्या. राशिद खान आणि हार्दिक पांड्या यांनी 15 चेंडूत 36 धावांची भागिदारी करत फिनिशिंग टच दिला. 


हर्षल पटेलची दुखापत, गुजरातला फायदा
आरसीबीकडून जोश हेजलवूडने दोन विकेट घेतल्या. तर मॅक्सवेल आणि वानंदु हसरंगा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. त्याशिवाय इतर गोलंदाजांना विकेट घेण्यात अपयश आले. पहिल्या षटकानंतर हर्षल पटेल दुखापतग्रस्त झाला होता. याचा फटका आरसीबीला अखेरच्या षटकात बसला... 


बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेडचा तोल ढासळला, पॅड फेकले, बॅट आदळली 
प्रथम फलंदाजी करताना सहाव्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर मॅथ्यू वेड पायचीत झाला.. पंचांचा हा निर्णय मॅथ्यू वेडला पचला नाही.. त्याने तात्काळ DRS घेतला. तिसऱ्या पंचांनीही मॅथ्यू वेडला बाद दिले.. बाद झाल्यानंतर मॅथ्यू वेडच्या चेहऱ्यावर निराशा दिसत होती... तो रागाच्या भरात मैदानाबाहेर गेला... त्यानंतर पॅव्हेलिअनमध्ये त्याने आपला राग बाहेर काढला... त्याने रागारागात पॅड फेकून दिले.. बॅट जोराने खाली मारली... हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला.. त्याला काही जणांनी समजावण्याचा प्रयत्नही केला.. पण तोपर्यंत व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता.. काही जणांनी त्याला अखिलाडीवृत्तीमुळे सुनावले... मॅथ्यू वेडचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय...