RR vs MI, IPL 2022 Marathi News : मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याच्या वाढदिवसाच्या मुहुर्तावर मुंबई इंडियन्सने अखेर पहिला विजय साकारला. लागोपाठ आठ सामन्यात पराभव मिळाल्यानंतर मुंबईने नवव्या सामन्यात विजय मिळवला. विजय मिळाल्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, मुंबईचा संघ आज पूर्ण क्षमतेने खेळला आणि जिंकला.. खासकरुन गोलंदाजांनी या सामन्यात कमाल केली.  


लागोपाठ आठ पराभवानंतर अखेर मुंबईने राजस्थानचा पराभव करत विजयाचा श्रीगणेशा केला. सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकाच्या बळावर मुंबईने राजस्थानचा पाच गड्यांनी पराभव केला. राजस्थान रॉयलने दिलेले 159 धावांचे आव्हान मुंबईने पाच गड्यांच्या मोबदल्यात पार केले. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्माच्या भागिदारीच्या बळावर मुंबईने आपला पहिला विजय साकार केला. या सामन्यानंतर बोलताना विराट कोहलीने मुंबई संघाचं कौतुक केले. तसेच सामना कसा जिंकला अन् विजयाचे श्रेयही दिले. 


रोहित शर्मा म्हणाला की, आज आम्ही खऱ्या अर्थाने पूर्ण क्षमतेने खेळलो. या हंगामात आमचा प्रवास निराशाजनक झाला. असं असताना अंतिम अकरामध्ये नेमकं कुणाला संधी द्यावी हे सूचत नाही. पण, आम्ही प्रयत्न केले आणि सर्वोत्तम संघ मैदानावर उतरवला. अनेक सामन्यांत आम्ही विजयाच्या जवळही आलो होतो. पण सामना जिंकण्यात अपयश आले. वाढदिवसाचं हे गिफ्ट नक्कीच मला हवहवसं वाटणारं आहे. राजस्थानच्या संघाकडे पाहिले तर ते एवढी कमी धावसंख्या उभारतील, असे मला वाटले नव्हते. पण गोलंदाजांनी यावेळी कमाल केली. खासकरून ह्रतिक शोकिन आणि कुमार कार्तिकेय सिंग यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. 


सामन्यात काय झाले?


 दरम्यान, रोहित शर्मा आज पुन्हा अपयशी ठरला. अश्विनने रोहित शर्माला दोन धावांवर तंबूत धाडले. रोहितनंतर ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांनी मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांची भागिदारी मोठी होईल, असे वाटत असतानाच ट्रेन्ट बोल्टने ईशान किशनला बाद केले. ईशान किशन 26 धावा काढून बाद झाला. ईशान किशनने 18 चेंडूत चार चौकार आणि एका षटकारासह 26 धावा जोडल्या.  ईशान किशन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने तिलक वर्माला जोडीला घेत मुंबईचा डाव सावरला. सूरकुमार यादवने 51 धावांची खेळी केली. सूर्यकुमार आणि तिलक वर्मा यांची जोडी यजुवेंद्र चहल याने फोडली. सूर्यकुमार यादवने 39 चेंडूत दोन षटकार आणि पाच चौकरांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. सूर्यकुमार यादवनंतर लगेच तिलक वर्माही बाद झाला. तिलक वर्माने 30 चेंडूत 35 धावांची खेळी केली. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी 56 चेंडूत 81 धावांची भागिदारी केली. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा बाद झाल्यानंतर मुंबईचा डाव गडगडणार का? असे वाटले. पण टीम डेविड याने मोक्याच्या क्षणी विस्फोटक फलंदाजी करत विजय मिळवून दिला.  टीम डेविडने 9 चेंडूत 20 धावांची खेळी केली. पोलार्ड पुन्हा एकदा फ्लॉप झाला, त्याने 14 चेंडूत 10 धावांची खेळी केली. ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, रविचंद्र अश्विन आणि यजुवेंद्र चाहल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.  जोस बटलरच्या अर्धशतकाच्या जोरावर राजस्थान रॉयल्सने निर्धारित 20 षटकांत सहा गड्यांच्या मोबदल्यात 158  धावा केल्या.  प्रथम फलंदाजी करताना राजस्थान रॉयल्सची सुरुवात निराशाजनक झाली. देवदत्त पडिक्कल (15) याला पुन्हा एकदा मोठी खेळी करण्यास अपयश आले. पडिक्कलनंतर कर्णधार संजू सॅमसनही माघारी परतला. संजू सॅमसनला फक्त 16 धावा करता आल्या. मुंबईकडून पदार्पण करणाऱ्य कार्तिकेय सिंह याने संजू सॅमसनचा अडथळा दूर केला.  डॅरेल मिचेलला प्रभावी कामगिरी करता आली नाही. मिचेल 17 धावांवर सॅम्सचा शिकार झाला. मागील सामन्यात अर्धशतकी खेळी करणाऱ्या रियान पराग तीन धावा काढून तंबूत परतला. रियानला रायली मेरिडेथने बाद कले. रविचंद्र अश्विन याने 9 चेंडूत 21 धावा करत राजस्थानची धावसंख्या वाढवली. अश्विन याने छोटेखानी खेळीदरम्यान एक षटकार आणि तीन चौकार लगावले. हेटमायरला फिनिशिंग टच देण्यात अपयश आले. हेटमायरने मोक्याच्या क्षणी 14 चेंडूत फक्त सहा धावांची खेळी केली.