IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सनं राजस्थान रॉयल्सला सात विकेट्सनं पराभूत करून आयपीएलचा खिताब जिंकला. या पराभवासह राजस्थानचं दुसऱ्यांदा आयपीएलची ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न भंगलं. ज्यामुळं राजस्थानचा कर्णधार संजू सॅमसनच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय संघाचा माजी खेळाडू हरभजन सिंहनं राजस्थानच्या पराभवाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. तसेच राजस्थानच्या हातातून विजय कसा निसटला? यावरही त्यानं प्रतिक्रिया दिली आहे. 


हरभजन सिंह काय म्हणाला?
हरभजन सिंह म्हणाला की, राजस्थान रॉयल्सनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घ्यायला हवा होता. पण त्यांनी प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजस्थानच्या फलंदाजांनी चुकीचे फटके खेळून विकेट गमावल्या. राजस्थान रॉयल्सच्या फलंदाजांनी परिस्थितीनुसार खेळायला हवं होतं. मात्र, तसे करण्यात राजस्थानचा संघ अपयशी ठरला. वरच्या फळीतील फलंदाजांना मोठी भागीदारी करता आली नाही. राजस्थान रॉयल्सचा संघ सलामीवीर जोस बटलरवर खूप अवलंबून आहे. परंतु, बटलर चांगली कामगिरी करू शकला नाही आणि इतर फलंदाजांनाही काही खास कामगिरी करता आली नाही.


राजस्थानचा सात विकेट्सनं पराभव
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण सॅमसनचा हा निर्णय चुकीचा ठरला. राजस्थान रॉयल्सला 20 षटकांत 9 विकेट्स गमावून केवळ 130 धावा करता आल्या. गुजरात टायटन्सनं हे लक्ष्य 18.1 षटकांत सात विकेट्स राखून पूर्ण केलं.


हे देखील वाचा-