अदमदाबाद : आयपीएलमध्ये पदार्पणात विजेतेपद पटकावण्याचा पराक्रम गुजरात टायटन्सने केला. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात गुजरातने चमकदार कामगिरी करत राजस्थानला एकतर्फी मात दिली. हार्दिक पांड्याने कॅप्टन इनिंग खेळतानाच राजस्थानचे तीन मोहरे टिपत कंबरडे मोडून टाकले. त्यामुळे अंतिम सामन्याचा मानकरी तोच ठरला. शुभमन गिलने षटकार ठोकत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
विजयानंतर गुजरात टायटन्सने केलेल्या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आहे. कारण गुजरातच्या विजयाने चाहत्यांना 2011 च्या टीम इंडियाच्या वर्ल्ड कप विजयाची आठवण झाली. त्यावेळी भारताने श्रीलंकेला धुळ चारताना मायदेशात विश्वविजेतेपद पटकावून मास्टर ब्लास्टर सचिनला 'गिफ्ट' दिले होते.
गुजरात टायटन्सने ट्विट करत म्हटले आहे की, नंबर 7 जर्सी, फिनिंशिग 6, संगा (कुमार संगकारा) आणि मलिंगाच्या टीमला हरवून गॅरी आणि नेहराजी सेलिब्रेट करत आहेत. यापूर्वी आपण असं पाहिलं होतं का ? गुजरातकडून करण्यात आलेल्या या ट्विटने फॅन्सचे चांगलेच लक्ष वेधले गेले. 2011 च्या वर्ल्ड कपमध्ये कॅप्टन कूल धोनीने षटकार ठोकून टीम इंडियाला विजय मिळवून दिला होता आणि त्यावेळी माहीच्या जर्सीचा नंबर 7 होता. त्याचबरोबर टीम इंडियाचे कोच गॅरी कर्स्टन होते, तर आशिष नेहरा टीम इंडियाचा भाग होता. दुसरीकडे कुमार संगकारा आणि लसिथ मलिंगा श्रीलंकेकडून खेळत होते.
आता आयपीएल फायनलवर बोलायचं झाल्यास सलामीवीर शुभमन गिलने षटकार ठोकत गुजरातच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. त्याची सु्द्धा जर्सी नंबर 7 होती. गॅरी कर्स्टन गुजरातचे बॅटिंग कोच आहेत. गुजरातच्या विजयानंतर गॅरी कर्स्टन आणि आशिष नेहरा जल्लोष करताना दिसून आले. दुसरीकडे राजस्थानकडून कोच संगकारा होता, तर बॉलिंग कोच मलिंगा आहे. हाच समान दुवा जोडून गुजरातने ट्विट केले. या ट्विटवरून चाहते कमेंट करत आहेत.
गुजरातने 19 व्या षटकांतील पहिल्याच चेंडूवर मॅकॉयच्य गोलंदाजीवर गिलने षटकार ठोकत गुजरातला पहिले विजेतेपद मिळवून दिले.