IPL 2022 : आयपीएलमध्ये आतापर्यंत अनेक युवा खेळाडूंनी आपला करिश्मा दाखवलाय. आयपीएलमधील कामगिरीच्या बळावर अनेक खेळाडूंना भारतीय संघात स्थान मिळालेय. यंदाच्या आयपीएलमध्येही अनेक युवा खेळाडूंनी प्रभावित केलेय. भारताचे माजी कोच रवी शास्त्री यांनाही आयपीएलमधील युवा खेळाडूंनी प्रभावित केलेय. पंजाबचा युवा डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याच्या कामगिरीवर रवी शास्त्री खूश आहेत. अर्शदीप भविषात भारतीय संघाचा भाग असेल, अशी भविष्यवाणीही रवी शास्त्री यांनी केली आहे. 


अर्शदीपने 2019 मध्ये पंजाबकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. यंदाचा त्याचा चौथा हंगाम आहे. अर्शदीप सिंह याने आतापर्यंत आयपीएलमध्ये भेदक मारा केलाय. सातत्याने पंजाबसाठी विकेट घेण्याचं काम अर्शदीपने केले आहे. त्यामुळेच पंजाबने त्याला रिटेन केले. हा डावखुरा गोलंदाज लवकर भारताच्या टी 20 संघात दिसेल, असे रवी शास्त्री यांनी सांगितलेय. ते एका क्रीडा न्यूज पोर्टलसोबत बोलत होते. 


23 वर्षीय डावखुरा अर्शदीप नव्या चेंडूवर प्रभावी मारा करतो, शिवाय डेथ ओव्हरमध्येही कंजूश गोलंदाजी करतो. अचूक टप्यावर मारा करणारा अर्शदीप फलंदाजाला मोठा फटका मारण्याची संधी देत नाही. आतापर्यंतच्या त्याच्या कामगिरीवर रवी शास्त्री यांनी तो लवकरच भारतीय संघाचा भाग असेल, अशी भविष्यवाणी केली आहे. रवी शास्त्री म्हणाले की, आयपीएलमध्ये युवा खेळाडू वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केलेय. वेळोवेळी त्यांनी भेदक मारा केलाय. अर्शदीपनेही आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केलेय. दबावात अर्शदीपचा खेळ अधिक उंचावतो. तसेच डेथ ओव्हरमध्येही अर्शदीप भेदक मारा करत आहे, त्यामुळे लवकरच तो भारतीय संघात दिसेल. 


'विराट कोहली यानं दीड-दोन महिने क्रिकेटपासून दूर राहावं' : रवी शास्त्री
माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी विराट कोहलीला काही काळ विश्रांती करण्याचा सल्ला दिला आहे. 'विराट कोहली यानं दीड-दोन महिने क्रिकेटपासून दूर राहावं, त्याने मानसिक थकवा टाळण्यासाठी ब्रेक घ्यावा', असं रवी शास्त्री म्हणाले आहेत. गेल्या काही सामन्यांत विराट कोहलीला सूर गवसत नसल्यानंच शास्त्री यांनी हा सल्ला दिला आहे.