IPL 2021 | इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या सुरूवातीला आता 15 दिवसांपेक्षा कमी दिवस राहिले आहेत. आयपीएल 2021 ची सुरुवात 9 एप्रिलपासून मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर यांच्या सामन्याने होणार आहेत. नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) एक मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने अलीकडेच आयपीएल 2021 पासून वादात सापडलेला 'सॉफ्ट सिग्नल' नियम काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
बीसीसीआयने हे स्पष्ट केले आहे की, आयपीएल 2021 मध्ये थर्ड अम्पायरकडे निर्णय पाठवण्यापूर्वी, ग्राउंड अम्पायरला सॉफ्ट सिग्नल देण्याची गरज लागणार नाही. भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकत्याच झालेल्या टी -20 मालिकेमध्ये सॉफ्ट सिग्नल नियम चर्चेत होता.
IPL 2021 : रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघात मोठा बदल होण्याची शक्यता
सॉफ्ट सिग्नल म्हणजे काय?
क्लोज कॅच किंवा एखाद्या विकेटबाबत निर्णय घेणे कठीण असते त्यावेळी ऑन-फील्ड अम्पायर थर्ड अम्पायरकडे मदत मागतात. मात्र थर्ड अम्पायरकडे मदत मागण्यासाठी दोन्ही अम्पायरना आपापसात चर्चा करुन आपला निर्णय द्यावा लागतो. याला सॉफ्ट सिग्नल म्हणतात. यानंतर थर्ड अम्पायर विविध अँगल त्याला पाहतो आणि जेव्हा त्याला ठोस पुरावे मिळतात तेव्हा तो ऑन-फील्ड पंचांच्या निर्णयाला बदलतो किंवा तसाच ठेवतो. मात्र कधीकधी थर्ड अम्पायरला सुद्धा पुरेसे पुरावे मिळत नाहीत. अशा परिस्थितीत थर्ड अम्पायर ऑन-फील्ड अम्पायरचा निर्णय स्वीकारतात.
IPL 2022: पुढच्या वर्षी आयपीएलमध्ये 10 संघ सहभागी होणार, दोन संघासाठी मे महिन्यात लिलाव
भारत-इंग्लंड सामन्यात काय होता वाद?
भारत-इंग्लंड यांच्यातील चौथ्या टी - 20 सामन्यात सूर्यकुमार यादव 57 धावांवर फलंदाजी करत होता. सूर्यकुमारने सॅम करनच्या गोलंदाजीवर स्कूप शॉट खेळला. चेंडू डेव्हिड मलानकडे गेला आणि त्याने कॅच घेतल्याचा दावा केला. परंतु, हा कॅच क्लीअर नव्हता, त्यामुळे मैदानातील अम्पायरने थर्ड अम्पायरची मदत घेतली. परंतु नियमानुसार, मैदानावरील पंचांनाही आपला निर्णय जाहीर करावा लागतो आणि पंचांनी आपल्या निर्णयामध्ये सूर्यकुमारला आऊट जाहीर केलं. त्यानंतर, जेव्हा थर्ड अम्पायरने अनेकदा टीव्ही पाहिला, परंतु कॅच पकडल्याचं स्पष्ट होत नव्हतं. त्यामुळे थर्ड अम्पायरने ऑन फील्ड अम्पायरच्या म्हणण्यानुसार निर्णय दिला आणि सूर्यकुमारला पॅव्हिलियनमध्ये परत जावे लागले. मात्र टीव्ही रिप्लेवरून स्पष्ट झाले की चेंडू मैदानाला टेकला होता. यावरुन विराट कोहलीने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर हा नियम चर्चेत होता.