IPL 2021, RRvcSRH : सनरायझर्स हैदराबाद (SRH) आणि राजस्थान रॉयल्स (RR) यांच्यात आज आयपीएल 2021 चा 40 वा सामना होणार आहे. हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून सुरु होईल. स्पर्धेत प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेल्या हैदराबाद संघासाठी हा सामना सन्मान वाचवण्याची लढाई असेल. तर 8 गुणांसह राजस्थानचा संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे आणि हा सामना जिंकून ते प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी प्रयत्न करतील.
हैदराबादने आतापर्यंत 9 पैकी 8 सामने गमावले आहेत. 2 गुणांसह हैदराबादचा संघ सध्या गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे आणि प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. दुसरीकडे, 9 सामन्यांत 8 गुणांसह राजस्थानचा संघ सध्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे आणि प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे.
युएईमध्ये आयपीएलच्या दुसऱ्या टप्प्यात राजस्थान आणि हैदराबाद या दोन्ही संघांनी आत्तापर्यंत प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. हैदराबादला त्यांच्या दोन्ही सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दुसरीकडे, राजस्थानने पंजाबविरुद्ध एक सामना जिंकला आहे. तर दिल्ली कॅपिटल्सकडून त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.
आयपीएल 2021 मध्ये आतापर्यंत हैदराबाद आणि राजस्थान या दोन्ही संघांच्या फलंदाजांनी निराशा केली आहे. डेव्हिड वॉर्नर या स्पर्धेत आतापर्यंत हैदराबादसाठी विशेष काही करू शकला नाही. वॉर्नर पहिल्या सामन्यात शून्यावर बाद झाला, तर दुसऱ्या सामन्यात त्याला फक्त दोन धावा करता आल्या. याशिवाय संघाचा कर्णधार केन विल्यमसनला आतापर्यंत फलंदाजीने काही विशेष करता आलेले नाही. या दोन आंतरराष्ट्रीय खेळाडूंकडून संघ चांगल्या डावाची अपेक्षा करेल. मात्र, आज जेसन रॉयचाही संघात समावेश होऊ शकतो. मनीष पांडे आणि केदार जाधव यांनाही मधल्या फळीत चांगली कामगिरी करावी लागेल. त्याचबरोबर जेसन होल्डरने शेवटच्या सामन्यात संघासाठी 47 धावांची जलद खेळी केली.
राजस्थानबद्दल बोलायचे तर तर कर्णधार संजू सॅमसन वगळता सर्व फलंदाजांनी येथे निराशा केली आहे. सॅमसनने शेवटच्या सामन्यात 70 धावांची शानदार खेळी केली. मात्र, त्याला संघातील इतर कोणत्याही फलंदाजाकडून फारसा पाठिंबा मिळालेला नाही. संघातील अनेक परदेशी खेळाडूंनी लीगमधून माघार घेतली आहे. त्याचा परिणाम राजस्थानच्या कामगिरीवर स्पष्टपणे दिसून येतोय. संघाचा स्टार अष्टपैलू ख्रिस मॉरिस देखील शेवटच्या सामन्यातून बाहेर होता. टीम आजच्या सामन्यात लियाम लिव्हिंगस्टोन, महिपाल लोमर आणि राहुल तेवातिया यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा करेल.
राशिद खान एक्स फॅक्टर ठरु शकतो
गोलंदाजीमध्ये हैदराबाद सरस आहे. स्टार लेग स्पिनर राशिद खान या सामन्यात संघासाठी एक्स फॅक्टर ठरू शकतो. याशिवाय भुवनेश्वर कुमारचा अनुभवही संघाला खूप उपयोगी पडू शकतो. याशिवाय जेसन होल्डर आणि खलील अहमदसारखे गोलंदाज संघाकडे आहेत, जे आजच्या सामन्यात खूप उपयुक्त ठरू शकतात.
दोन्ही संघ आमने-सामने
आयपीएलमध्ये आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यांविषयी बोलायचे झाले तर, दोन्ही संघ समतुल्य वाटतात. राजस्थान आणि हैदराबाद यांच्यात लीगमध्ये आतापर्यंत 14 लढती झाल्या आहेत. त्यापैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी सात वेळा विजय मिळवला आहे. त्याच वेळी, दोन्ही संघांमधील शेवटचा सामना भारतात आयपीएलच्या पहिल्या टप्प्यात झाला होता, ज्यामध्ये राजस्थानने सहज 55 धावांनी विजय मिळवला.
राजस्थान रॉयल्स संभाव्य संघ : एविन लुईस, यशस्वी जैस्वाल, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), लियाम लिव्हिंगस्टोन, रियान पराग, शिवम दुबे, ख्रिस मॉरिस, राहुल तेवातिया, कार्तिक त्यागी, मुस्तफिझूर रहमान आणि चेतन साकारिया.
सनरायझर्स हैदराबाद संभाव्य संघ : केन विल्यमसन (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर/जेसन रॉय, मनीष पांडे, रिद्धीमान साहा (यष्टीरक्षक), अभिषेक शर्मा, जेसन होल्डर, अब्दुल समद, भुवनेश्वर कुमार, रशीद खान, संदीप शर्मा आणि खलील अहमद.