IPL 2021 Final Match: आयपीएल (IPL 2021) च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) ने प्रथम फलंदाजी करताना कोलकाता नाईट रायडर्सला (KKR) 193 धावांचे लक्ष्य दिले आहे. फाफ डु प्लेसिसने चेन्नईकडून 86 धावांची नाबाद खेळी केली. चेन्नईचा सलामीवीर ऋतुराज गायकवाडने 32 धावांचे योगदान दिले. याशिवाय रॉबिन उथप्पाने 15 चेंडूत 31 धावांची तुफानी खेळी केली. तर मोईन अलीने 20 चेंडूत नाबाद 37 धावा केल्या. कोलकात्याकडून सुनील नरेनने 2 बळी घेतले. चेन्नईच्या फलंदाजांनी अंतिम सामन्यात आपलं काम केलं आहे आणि आता संपूर्ण जबाबदारी गोलंदाजांवर आहे. आता केकेआरचे फलंदाज कशी कामगिरी करतात हे पाहणे मनोरंजक असेल.
 
फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाडचा एक अनोखा विक्रम
चेन्नईचे सलामीवीर फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी चांगली कामगिरी करत चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली. या सामन्यात दोन्ही फलंदाजांनी भागीदारीचा अनोखा विक्रम केला. या हंगामात दोन्ही फलंदाजांमध्ये सर्वाधिक 756 धावांची भागीदारी झाली. आयपीएलच्या इतिहासातील एका हंगामातील ही तिसरी सर्वोच्च भागीदारी आहे. आयपीएल 2016 मध्ये विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्सने 939 धावांची विक्रमी भागीदारी केली. यानंतर, डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी आयपीएल 2019 मध्ये 791 धावांची भागीदारी केली होती. 


धोनीचा 300 वा टी -20 सामना
तत्पूर्वी, दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आयपीएल 2021 च्या अंतिम सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार इऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. केकेआर आणि सीएसके संघांनी या सामन्यासाठी त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केला नाही. कर्णधार म्हणून धोनीचा हा 300 वा टी -20 सामना आहे. या पदावर पोहोचणारा तो जगातील पहिला कर्णधार बनला आहे. धोनीशिवाय, वेस्ट इंडिजचा डॅरेन सॅमी 200 पेक्षा जास्त सामन्यांमध्ये कर्णधार होणारा एकमेव खेळाडू आहे. धोनीने 213 सामन्यांमध्ये यलो ब्रिगेडचे नेतृत्व केले असून 130 विजय आणि 81 पराभव स्वीकारले आहेत. त्याच्या नेतृत्वाखाली सीएसकेने आयपीएल 2010, 2011 आणि 2018 जिंकले आहे.