मुंबई : इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या तेराव्या मोसमातील साखळी फेरी संपली आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेन्जर्स बंगलोर आणि सनरायझर्स हैदराबाद या संघांनी प्लेऑफमध्ये जागा निश्चित केली आहे. डेव्हिड वॉर्नरच्या नाबाद 85 धावांच्या खेळीमुळे हैदराबादने मुंबई इंडियन्सवर दहा विकेट्सनी मात करुन प्लेऑफमध्ये धडक मारली. या खेळीसह वॉर्नरने या मोसमात 500 धावा पूर्ण केल्या आहेत. आयपीएलमध्ये एखाद्या संघासाठी 6 मोसमात 500 पेक्षा जास्त धावा बनवणारा वॉर्नर पहिलाच खेळाडू बनला आहे.
सलग सहा मोसमात सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळणाऱ्या डेव्हिड वार्नरने 500 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नरच्या या उत्तम कामगिरीचा सिलसिला 2014 मध्ये सुरु झाला. वॉर्नरने 2014 मध्ये 528 धावा केल्या होता. तर पुढच्या वर्षी म्हणजेच 2015 मध्ये 562 धावा करण्यात वॉर्नरला यश आलं.
सर्वात यशस्वी फलंदाज
2015 मध्ये दमदार कामगिरी करत डेव्हिड वॉर्नरने 848 धावा केल्या होता आणि संघाला विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 2017 मध्ये वॉर्नरने 641 धावा केल्या आणि आपला शानदार फॉर्म कायम ठेवला.
बॉल टेम्परिंग वादामुळे वॉर्नर 2018 च्या आयपीएलमध्ये खेळू शकला नाही. परंतु 2019 मध्ये त्याने जबरदस्त कमबॅक करत 692 धावा बनवल्या. उत्तम कामगिरीचं बक्षीस म्हणून मागील वर्षी त्याच्याकडे पुन्हा एकदा संघाची धुरा सोपवली. डेव्हिड वॉर्नरने यंदाच्या आयपीएलमधल्या साखळी फेरीत 501 धावा केल्या आहेत.
डेव्हिड वॉर्नर आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी फलंदाज आहे. वॉर्नरने 140 सामन्यांमध्ये 43.26 च्या सरासरीने 5235 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्ये वॉर्नरने चार शतकं आणि 48 अर्धशतकं केली आहेत.