IPL 2020, MIvsSRH: आयपीएलच्या 56 व्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने मुंबईचा 10 विकेट्सने पराभव करत प्ले-ऑफमध्ये प्रवेश केला. मुंबईने दिलेले 150 धावांचं आव्हान 17.1 षटकात पूर्ण केलं. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि वृद्धिमान साहा या दोघांनी संघाला एकहाती विजय मिळवून दिला. दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर हैदराबादचा विजय सोपा झाला.


मुंबईने दिलेल्या 150 धावांना पाठलाग करताना हैदराबादकडून डेविड वॉर्नरने 58 चेंडूत 85 धावा केल्या. या खेळीत वॉर्नरने 10 चौकार आणि एक षटकार लगावला. तर वृद्धिमान साहाने 45 चेंडूत 58 धावा केल्या या खेळीत त्याने 7 चौकार आणि एक षटकार लागवला.


त्याआधी प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबईची सुरुवात खराब झाली. दुखापतीनंतर परतलेला कर्णधार रोहित शर्मा अवघ्या चार धावावर बाद झाला. त्यानंतर क्विंटन डिकॉक आणि सूर्यकुमार यादवने मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. क्विंटन डिकॉकने 13 चेंडूत 25 धावा केल्या तर सूर्यकुमार यादवने 29 चेंडूत 36 धावा केल्या. डिकॉक बाद झाल्यानंतर आलेल्या ईशान किशनने 33 धावांची खेळी केली. त्यानंतर कायरन पोलार्ड वगळता मुंबईचा एकही फलंदाज दोन आकडी धावसंख्याही करु शकला नाही. कायरन पोलार्डने दोन चौकार चार षटकारांच्या मदतीने 25 चेंडूत 41 धावा केल्या. त्यामुळे मुंबईचा संघ 149 धावांपर्यंत मजल मारू शकला.


प्ले-ऑफमध्ये गुरूवारी मुंबई विरूद्ध दिल्ली तर शुक्रवारी हैदराबाद विरूद्ध बंगळुरू असा सामना असणार आहे. पहिल्या सामन्यातील विजेता थेट अंतिम फेरीत जाईल. तर पहिल्या सामन्यातील पराभूत संघ दुसऱ्या सामन्यातील विजेत्याशी भिडेल. त्यातून अंतिम फेरीतील दुसरा संघ निवडला जाईल.