दुबई : राजस्थानचा धडाडीचा फलंदाज संजू सॅमसन यांने IPL 2020 च्या तेराव्या हंगामात सर्वाधिक सिक्स मारले आहेत. सुरवातीच्या काही सामन्यात आक्रमकपणे फलंदाजी करणाऱ्या संजू सॅमसनने मधल्या काळात त्याचा फॉर्म गमावला होता. असे असले तरी 25 वर्षीय या फलंदाजाने आतापर्यंत 13 सामन्यात 374 धावा केल्या आहेत. यात त्याने तीन अर्धशतके केली आहेत आणि तब्बल 26 सिक्स मारले आहेत.


किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज निकोलस पुराण यांने 13 सामन्यांत 25 सिक्स मारले आहेत आणि या यादीत दुसरा क्रमांक पटकवला आहे.आतापर्यत झालेल्या सामन्यांपैकी केवल अर्धेच सामने खेळण्याची संधी मिळालेल्या ख्रिस गेलने केवळ 6 सामन्यांत 23 सिक्स मारले आहेत. तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. केवळ सहा सामन्यात त्याने तीन अर्धशतके आणि 276 धावा पटकावल्या आहेत. यात त्याने 15 चौकार मारले आहेत.


किंग्ज इलेव्हन पंजाबचा विकेट किपर के.एल. राहुल याने आतापर्यंत 13 सामने खेळले आहेत. या हंगामात त्याने सर्वात चांगला परफॉर्मंस केला आहे. त्याने 13 सामन्यात एकूण 58.27 च्या सरासरीने 641 धावा केल्या आहेत. यात त्याचे 5 अर्धशतके आणि एक शतकाचा समावेश आहे आणि सध्या त्याच्याकडे ऑरेंज कॅपचा मान आहे. त्याने आतापर्यंत 22 सिक्स मारले आहेत. या हंगामात त्याने सर्वाधिक म्हणजे 55 चौकार मारले आहेत.


मुंबई इंडियन्सचा फलंदाज इशान किशनने या हंगामात त्याच्या फलंदाजीत सातत्य ठेवले आहे. त्याने 10 सामन्यात 323 धावा केल्या आहेत. त्यात त्याच्या दोन अर्धशतकांचा समावेश आहे. त्याने 21 सिक्स मारले आहे आणि सिक्सच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे. एबी डिव्हिलियर आणि हार्दिक पांड्याने प्रत्येकी 20 सिक्स मारले आहेत.


सर्वाधिक चौकार के.एल. राहुलच्या नावावर


चौकारांच्या यादीत के.एल. राहुल याच्यानंतर शिखर धवनचा क्रमांक लागतो. त्याने 12 सामन्यात 52 चौकार मारले आहेत. त्यानंतर 12 सामन्यात 48 चौकार मारणारा मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर आहे.


ऑरेंज कॅपवर राहुलचा कब्जा


के.एल. राहुल याने आतापर्यंत 13 सामन्यात 641 धावा करुन त्याने ऑरेंज कॅपवर आपला दावा मजबूत केला आहे. आयपीएलमध्ये दोन शतकं झळकावणारा शिखर धवन या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. शिखरने 11 सामन्यात 471 धावा केल्या आहेत. त्यात दोन शतके आणि दोन अर्धशतके यांचा समावेश आहे. तिसऱ्या स्थानी असणाऱ्या सनराइजर्स हैदराबादच्या कर्णधार डेविड वार्नरने 436 धावा केल्या आहेत. रॉयल चैलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली 424 धावा केल्या आहेत तो चौथ्या क्रमांकावर आहे. पाचव्या स्थानावर आरसीबीचा देवदत्त पडिक्कल आहे, त्याने 12 सामन्यात 417 धावा केल्या आहेत.


पर्पल कॅपसाठी रबाडा-बुमराहमध्ये टक्कर


दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा 23 विकेट्स घेतल्या आहेत. सध्या त्याच्याकडे पर्पल कॅप आहे. त्याच्यानंतर मुंबईचा जसप्रीत बुमराहने 12 सामन्यात 20 विकेट्स घेत दुसरे स्थान पटकावले आहे. पंजाबच्या मोहम्मद शमीने देखील 20 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर 19 विकेट्स घेणाऱ्या राजस्थानच्या जोफ्रा आर्चरचा क्रमांक लागतो. आरसीबीचा यजुवेंद्र चहलने 18 विकेट्स घेतल्या आहेत. तो पाचव्या स्थानी आहे.