RR vs KKR : आयपीएल 2020 मधील 12व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सचा 37 धावांनी पराभव केला. पहिल्यांदा फलंदाजीसाठी मैदानावर उतरलेल्या कोलकाताने 20 ओव्हर्समध्ये सहा विकेट्स गमावत 174 धावा केल्या. कोलकाताचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या राजस्थानच्या संघाने 20 ओव्हर्समध्ये 9 विकेट्स गमावत केवळ 137 धावा केल्या.


मैदानावर पहिल्यांदा फलंदाजीसाठी उतरलेल्या कोलकाताला पहिला झटका 36 धावांवर सुनील नारेन बाद झाल्यानंतर लागला. नारेन 15 धावा काढून जयदेन उनादकटच्या चेंडूवर क्लिन बोल्ड झाला. त्यानंतर नितीश राणा आणि शुभमन गिलने भार सांभाळला. शुभमनने 34 चेंडूंमध्ये पाच चौकार आणि एक षटकार फटकावत 47 धावा केल्या. तसेच राणाने 17 चेंडूंमध्ये दोन चौकार आणि एक सिक्स फटकावत 22 धावा केल्या. दोघांनी दुसऱ्या विकेट्ससाठी 46 धावांची भागीदारी केली.





दरम्यान, 82 धावांवर कोलकाताच्या संघाने दुसरा विकेट गमावला. केकेआरने 115 धावांवर आपले सर्वात महत्त्वाचे 5 फलंदाज गमावले. यावेळी दिनेश कार्तिक 00 आणि आंद्रे रसेल 24 धावा करून माघारी परतले. त्यानंतर संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत इयोन मोर्गेनने 23 चेंडूंमध्ये 34 धावांची नाबाद खेळी केली. मार्गेनने एका चौकार आणि दोन षटकार लगावले. त्यांच्या व्यतिरिक्त पँट कमिंसने 12 आणि कमलेश नागरकोटीने नाबाद 8 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.


राजस्थान रॉयल्ससाठी जोफ्रा आर्चरने गोलंदाजी करत केवळ 18 धावा देत एक विकेट मिळवला. याव्यतिरिक्त अंकित राजपूत, जयदेव उनादकट, टॉम कर्रन आणि राहुल तेवतिया यांनीही प्रत्येकी एक-एक विकेट घेतला. त्यानंतर कोलकत्ताने दिलेलं 175 धावांचं आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या राजस्थानच्या संघाची सुरुवात अत्यंत खराब झाली.


दुसऱ्या ओव्हरमधील शेवटच्या चेंडूवर स्टीव्ह स्मिथ केवळ 3 धावा काढून माघारी परतला. स्मिथनंतर संघातील स्टार फलंदाज संजू सॅमसनही केवळ 08 धावा काढून माघारी परतला. त्यानंतर रॉबिन उथप्पा 02, रियान पराग 01 आणि गेल्या सामन्यातीत हिरो राहुल तेवतिया 14 धावांवर बाद झाला. राजस्थानने केवळ 42 धावांवर आपले पाच विकेट्स गमावले होते. त्यानंतर टॉम कर्रनने संघाची बाजू सांभाळल. कर्रनने 36 चेंडूंमध्ये नाबाद 54 धावांची खेळी केली. कर्रनचं आयपीएलमधील हे पहिलं अर्धशतक आहे.


कोलकातासाठी त्यांच्या सर्वच गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. दरम्यान, सुनील नारेनने चार ओव्हरमध्ये केवळ 40 धावा देत एक विकेट घेतला. तसेच पँट कमिंसने तीन ओव्हर्समध्ये 13 धावा देत एक विकेट घेतला. याव्यतिरिक्त शिवम मावी, कमलेश नागरकोटी आणि वरुण चक्रवर्ती यांनीही प्रत्येकी दोन विकेट्स घेतले.


महत्त्वाच्या बातम्या :