IPL 2020 : आजपासून इंडियन प्रीमियर लीगच्या 13व्या सीझनला दुबईत सुरुवात होणार आहे. या सीझनमधील सलामीचा पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात रंगणार आहे. गेल्या वर्षी फायनलमध्ये एकमेकांविरुद्ध लढलेले रोहित शर्मा आणि धोनी आता पुन्हा एकदा सलामीच्या लढतीत एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. अशातच तब्बल 15 महिन्यांनी महेंद्र सिंह धोनी मैदानावर खेळण्यासाठी उतरणार आहे. याआधी धोनी गेल्या वर्षी जुलैमध्ये न्यूझीलंड विरूद्ध आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.





गेल्या महिन्यात 15 ऑगस्ट रोजी सर्वांना आश्चर्यचकीत करत महेंद्र सिंह धोनीन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. गेल्या एका वर्षात धोनी निवृत्ती घेणार असल्याचे अनेक तर्क वितर्क लावण्यात येत होते. परंतु, धोनीने यासंदर्भात कधीच कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. दरम्यान सध्या धोनीच्या खांद्यावर चेन्नई सुपर किंग्सची मदार असून त्याच्या नेतृत्त्वात संघ आज सलामीचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आयपीएलमध्ये धोनी या सीझननंतर खेळणार की नाही, यासंदर्भातही चर्चा रंगल्या आहेत. अशातच सीएसकेच्या संघा व्यवस्थापकांचं म्हणणं आहे की, धोनी सीएसकेसाठी आणखी दोन सीझन खेळणार आहे.





चेन्नई सुपर किंग्सने काही दिवसांपूर्वी आपल्या ऑफिशिअल ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ ट्वीट केला होता. यामध्ये सीएसकेचे खेळाडू आपापसांत एक प्रॅक्टिस मॅच खेळत होते. प्रॅक्टिस मॅचमध्ये धोनीने ज्याप्रकारे धमाकेदार शॉट्स लगावले, ते पाहून असा अंदाजा लावूच शकतो की, मैदानापासून इतके दिवस दूर असूनही धोनीच्या खेळीवर काहीच परिणाम झालेला नाही. चेन्नई सुपर किंग्सने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रायडूदेखील क्लासी शॉट्स खेळताना दिसत आहे. चेन्नई सुपर किंग्सने प्रॅक्टिस मॅचचा व्हिडीओ शेअर केला आहे. या मॅचमध्ये चेन्नई सुपर किंग्सचे सर्व खेळाडू सहभागी झाले होते. प्रॅक्टिस मॅच दरम्यान, धोनी, वॉटसन आणि रायडू धमाकेदार शॉट्स खेळताना दिसून आले. या मॅचमध्ये जडेजा, डु प्लेसिस, पीयुष चावला, शार्दुल ठाकूरही दिसून आले होते.


दरम्यान, दुबईत पोहोचल्यानंतर आयपीएलमधील स्टार संघ म्हणून ओळख असलेल्या चेन्नई सुपर किंग्सला अनेक धक्क्यांचा सामना करावा लागला. सीएसकेमधील खेळाडूंसह काही क्रू मेंबर्सना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. परंतु, क्वॉरंटाईनचा काळ पूर्ण केल्यानंतर संघाने आयपीएलसाठी कंबर कसली आहे. अशातच संघाचा स्टार फलंदाज सुरेश रैनाने कोरोना व्हायरसचा वाढता धोका पाहता आयपीएलमधून माघार घेत भारतात परतण्याचा निर्णय घेतला. तसेच दिग्गज स्पिनर हरभजन सिंहने देखील वैयक्तिक कारणामुळे आयपीएलच्या 13व्या सीझनमधून माघार घेतली आहे.


महत्त्वाच्या बातम्या :