मुंबई : क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टिनिटी! अर्थात क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. आणि आयपीएलसारख्या क्रिकेटच्या जागतिक व्यासपीठावर याचा प्रत्यय अनेकदा आलाय.


आता ताजच उदाहरण घ्या... किंग्स इलेव्हन पंजाबनं राजस्थान रॉयल्ससमोर ठेवलं होतं 224 धावांचं भलं मोठं आव्हान. आयपीएलच्या आजवरच्या इतिहासात या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग कोणीच केला नव्हता. पण स्टीव्ह स्मिथच्या राजस्थान रॉयल्सनं ती अशक्यप्राय गोष्ट साध्य करुन दाखवली. आणि शारजाच्या मैदानात रचला एक नवा इतिहास.


राजस्थानच्या या विजयाच्या पाया रचला तो कर्णधार स्मिथनं. 27 चेंडूत त्याची 50 धावांची खेळी आत्मविश्वासानं भरलेली होती. त्यानंतर बहरात असलेल्या संजू सॅमसननं शारजाच्या फार मोठ्या नसलेल्या सीमारेषांचा भरपूर फायदा घेत 85 धावा कुटल्या. खरंतर संजू सॅमसन बाद झाला तेव्हा राजस्थानसाठी विजयाचं समीकरण होतं 23 चेंडू आणि 63 धावा. आणि समोर होता चाचपडत खेळणारा राहुल तेवातिया.


स्मिथ बाद झाल्यानंतर मूळचा हरयाणाचा असलेला हा अष्टपैलू खेळाडू मैदानात आला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण रॉबीन उथप्पा, रायन परागसारखे अष्टपैलू संघात असताना तेवातियाला वरच्या क्रमांकार फलंदाजीला उतरवणं आणि तेही विशाल आव्हानाचा पाठलाग करताना, कर्णधार स्मिथ आणि प्रशिक्षक अमोल मुझुमदारची ही खेळी क्रिकेटरसिकांना कळली नाही. त्यात तेव्हातियाच्या फलंदाजीनं हा सामना राजस्थानच्या हातून गेलाच अशी एकवेळ स्थिती होती. पण तेवातिया शांत होता. संजू सॅमसन बाद झाला त्या 17व्या षटकाअखेर तेवातियाच्या खात्यात होत्या २३ चेंडूत अवघ्या सतरा धावा. एव्हाना सोशल मीडियात तेव्हातियाच्या नावानं अनेकांनी बोटं मोडायला सुरुवात देखील केली.


पण अठराव्या षटकात तेवातियानं गिअर बदलला. गोलंदाजीला समोर विंडीजचा शेल्डन कॉटरेल. विजयाचं समीकरण 18 चेंडू 57 धावा. कॉटरेलचा पहिला चेंडू - षटकार, दुसरा चेंडू - षटकार, तिसरा चेंडू - षटकार,  चौथा चेंडू - षटकार, पाचवा चेंडू - निर्धाव आणि सहाव्या चेंडूवर पुन्हा षटकार. शेल्डन कॉटरेलच्या अठराव्या षटकात तेवातियानं तब्बल पाच षटकारांसह ३० धावा कुटल्या. अशी कामगिरी करणारा तेवातिया ख्रिस गेलनंतरचा आयपीएलमधला दुसराच खेळाडू ठरला.


तेवातियाच्या खेळीनं राजस्थाननं पंजाबचा विजयाचा घास अक्षरश: हिरावून घेतला. स्मिथ आणि सॅमसननं रचलेल्या भक्कम पायावर तेवातियानं सात षटकारांच्या साहाय्यानं 53 धावा ठोकून विजयाचा कळस चढवला.


मूळच्या हरयाणाच्या असलेल्या राहुल तेवातियानं 2014 साली राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल पदार्पण केलं होतं. त्यानंतर 2017 साली तो किंग्स इलेव्हन पंजाबच्या ताफ्यात सामील झाला. 2018  आणि 2019 च्या मोसमात तो दिल्ली कॅपिटल्सकडून खेळला. त्यानंतर आयपीएलच्या तेराव्या मोसमासाठी झालेल्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सनं अजिंक्य रहाणेच्या बदल्यात आपल्या ताफ्यातील मयांक मार्कंडे आणि राहुल तेवातिया हे दोन हिरे राजस्थानला दिले.





राजस्थानच्या गेल्या दोन्ही सामन्यात राहुल तेवातियाची कामहगिरी निर्णायक ठरली आहे. त्यामुळे मोसमाच्या पुढच्या सामन्यांमध्ये या 27 वर्षांच्या हरयाणवी वीराच्या कामगिरीवर आयपीएल चाहत्यांचं लक्ष राहिल.