Hardik Pandya Says Rohit Sharma Playing Under Me: आयपीएलच्या (Indian Premier League) आगामी सीझनला काही दिवसांतच सुरुवात होणार आहे. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगचा महासंग्राम यंदा भारतातच रंगणार आहे. यंदाची आयपीएल मात्र इतर सीझनपेक्षा थोडी वेगळी असणार आहे. त्यातल्या त्यात मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians). पहिल्या सीझनपासून मुंबईची कमान आपल्या खांद्यावर सांभाळणाऱ्या रोहित शर्माकडून (Rohit Sharma) कर्णधारपद काढून घेऊन ही जबाबदारी हार्दिक पांड्याकडे (Hardik Pandya) सोपवण्यात आली आहे. एमआय (MI) फ्रँचायझीच्या या निर्णयानं चाहत्यांचा रोष ओढवून घेतला. मुंबई इंडियन्स म्हणजे, आयपीएलमधील (IPL 2024) सर्वात यशस्वी फ्रँचायझी. रोहितच्या नेतृत्त्वात संघानं आतापर्यंत पाच आयपीएल ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं आहे. अजूनही मुंबईचे चाहते रोहित शर्मानंच कर्णधारपद भूषवावं याच भूमिकेत आहे. अशातच काल (सोमवारी) मुंबईचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याची पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेत हार्दिकनं रोहित शर्मा त्याच्या नेतृत्त्वात आयपीएल खेळेल असं म्हटलं आहे. पण पुढे तो जे काही बोललं त्यानं नक्कीच एमआय फॅन्सची ऊर अभिमानं भरुन येईल.
मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार हार्दिक पांड्यानं सोमवारी सांगितलं की, आयपीएलच्या आगामी सीझनमध्ये रोहित माझ्या नेतृत्त्वात खेळेल, पण रोहित शर्मा कायम माझ्यासाठी मार्गदर्शके असेल. मागील दोन सीझनमध्ये गुजरात टायटन्सचं नेतृत्व करणारा पांड्या 2024 च्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करणार आहे. पाच विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सनं अचानक रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवलं आणि हार्दिक पांड्याकडे संघाची जबाबदारी सोपवली.
रोहित माझ्यासाठी नेहमीच मार्गदर्शक : हार्दिक पांड्या
सोमवारी पार पडलेल्या पत्रकार परिषदेत हार्दिक पांड्याला याच प्रश्नांचा सामना करावा लागला. हार्दिक पांड्यानं यावेळी अगदी शांतपणे सर्व प्रश्नांची उत्तरं दिली. तो म्हणाला की, "रोहित माझ्या नेतृत्त्वात खेळला, तर काहीही वेगळं होणार नाही. माझ्या मदतीसाठी तो सदैव तत्पर असेल. तो भारतीय संघाचा कर्णधार असल्याचं तुम्हीच बोलताना नमूद केलंय, ते माझ्यासाठी खरंच खूप फायदेशीर ठरणार आहे. कारण या संघानं आतापर्यंत जे काही साध्य केलंय, ते त्यांच्या नेतृत्वातच साध्य झालं आहे आणि मला हीच प्रक्रिया पुढे न्यावी लागेल."
पांड्याने पुढे म्हटलं की, संघाचा कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून तो रोहितला भेटलेला नाही. सोमवारपासून सुरू होणाऱ्या संघाच्या सराव सत्रात तो पहिल्यांदाच रोहितला भेटणार आहे. रोहितला भेटण्याबद्दल विचारल्यावर तो म्हणाला, "हो आणि नाही. तो प्रवास करतोय आणि राष्ट्रीय संघाकडून खेळतोय. आम्ही खेळाडू आहोत. दोनच महिने झालेत. आज आपण सराव सामना खेळू, तो इथे आल्यावर त्याच्याशी नक्कीच बोलीन."
रोहित या सीझनमध्ये माझ्या नेतृत्त्वात खेळणार : हार्दिक पांड्या
"रोहित कायम माझ्यासाठी मार्गदर्शक असेल. त्यामुळे या सीझनमध्ये तो माझ्या नेतृत्त्वात खेळणार ही परिस्थिती इतर सीझनपेक्षा वेगळी असेल असं मला वाटत नाही. ही चांगली भावना असेल कारण आम्ही 10 वर्षांपासून एकत्र खेळत आहोत. मी माझी संपूर्ण कारकीर्द त्याच्या नेतृत्वाखाली खेळली आहे. मला आशा आहे की, तो मला पाठिंबा आणि मार्गदर्शन करत राहील."
वर्ल्डकप 2023 मध्ये हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून तो मैदानापासून दूर होता. आता हार्दिक पांड्या आयपीएलच्या मैदानात खेळताना दिसणार आहे. दुखापतीतून सावरल्यानंतर हार्दिक नव्या जबाबदारीसह मैदानात खेळताना दिसणार आहे. ऑक्टोबरमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकादरम्यान घोट्याच्या दुखापतीमुळे तो जवळपास तीन महिने मैदानापासून दूर होता. पांड्या म्हणाला, "सध्या मी फिट अन् फाईल आहे, मी सर्व सामने खेळण्याचा विचार करत आहे. तरीही मी आयपीएलमध्ये बरेच सामने गमावलेले नाहीत. मी तांत्रिकदृष्ट्या तीन महिने बाहेर होतो. ही एक विचित्र दुखापत होती आणि माझ्या आधीच्या दुखापतीशी याचा काहीही संबंध नव्हता. मैदानात फिल्डिंग करण्याच्या प्रयत्नात मला दुखापत झाली होती."
दरम्यान, 30 वर्षांच्या हार्दिक पांड्यानं पहिल्यांदाच मोठ्या मंचावर कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर मोठं यश संपादन करत गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवलं. आता त्याच्याकडून मुंबई फ्रँचायझींनाही अशाच अपेक्षा असतील. तो म्हणाला, ‘मुंबई इंडियन्सकडून नेहमीच अपेक्षा असतील. आपण खेळावर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. मी उद्या जिंकू शकत नाही, आम्हाला दोन महिने थांबावं लागेल आणि आम्ही कसे तयारी करतो, आम्ही कसे एकत्र होतो, ते पहावं लागेल. सर्वांना आनंद मिळेल अशा पद्धतीनं आम्ही खेळू.''