Mumbai Indians Hardik Pandya: रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद स्वीकारले तेव्हापासून त्याला ट्रोल करण्यात येत आहे. हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईने आतापर्यंत आयपीएल 2024च्या हंगामातील दोन्ही सामने गमावले आहेत .


एकीकडे हार्दिकच्या कर्णधारपदावर आणि त्याच्या भूमीकेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. याचदरम्यान त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये श्रीलंकेचा दिग्गज क्रिकेटर आणि मुंबईचा गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा याने हार्दिकला बसण्यासाठी आपली खुर्ची सोडल्याचे दिसून येत आहे.


नेमकं प्रकरण काय?


सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यादरम्यान, मुंबई इंडियन्सचे गोलंदाजी प्रशिक्षक लसिथ मलिंगा आणि फलंदाजी प्रशिक्षक किरॉन पोलार्ड मैदानाबाहेरील खुर्च्यांवर एकत्र बसले होते. हार्दिक पांड्या बाद होऊन माघारी परतला तेव्हा तो सीमारेषेवर उभा होता. यावेळी मागे मलिंगा आणि पोलार्ड एकमेकांशी चर्चा करत होते. यावेळी हार्दिक पांड्या तिकडे येताच मलिंगा त्याच्या जागेवरुन उठतो आणि हार्दिकला खुर्चीवर बसलायला देतो. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये पोलार्ड आपल्या खुर्चीवरुन उठणार होता, तितक्यात मलिंगाने त्याला थांबवले, खुर्ची सोडली आणि तिथून निघून गेला. या घटनेमुळे लोक हार्दिकला खूप ट्रोल करत आहेत. काहीजण याला हार्दिकची भीती म्हणत आहेत तर काहीजण त्याची वाईट वृत्ती म्हणत आहेत, त्यामुळे संघातील खेळाडूंनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.


पाहा व्हिडिओ-






हार्दिकच्या कर्णधारपदावर प्रश्न-


मुंबई इंडियन्सच्या खराब कामगिरीसाठी हार्दिक पांड्याला जबाबदार धरले जात असून त्याच्यावर बरीच टीकाही होत आहे. हैदराबादविरुद्धच्या पराभवानंतर हार्दिकच्या कर्णधारपदावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हैदराबाद आणि मुंबईच्या सामन्यानंतर नीता अंबानी, आकाश अंबानी आणि रोहित शर्मा बोलत असलेले फोटोही व्हायरल होत आहेत. याशिवाय जसप्रीत बुमराहला हैदराबादविरुद्ध गोलंदाजीसाठी उशीरा आणण्याच्या हार्दिकच्या निर्णयावरही बरीच टीका होत आहे.


मुंबई इंडियन्समध्ये फुट पडल्याची चर्चा-


मुंबईच्या संघातून एक मोठी माहिती समोर येत आहे. मुंबईच्या संघात दोन गट पडल्याचे सांगण्यात येत आहे. एक गटात रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा आणि इतर खेळाडूंचा समावेश असून दुसऱ्या गटात हार्दिक पांड्या आणि इशान किशन आणि इतर खेळाडूंचा समावेश असल्याची चर्चा रंगली आहे. अद्याप अधिकृत कोणतीही माहिती समोर आली नसली तर मुंबई इंडियन्सच्या संघात दोन गट पडल्याचा दावा सोशल मीडियावर केला जात आहे.