Harbhajan Singh on Abhishek Sharma : सनरायजर्स हैदाराबादने बुधवारी लखनौ सुपर जायंट्सचा 10 विकेट आणि 10 षटकं राखून दारुण पराभव केला. लखनौनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात चार विकेटच्या मोबदल्यात 165 धावा केल्या होत्या. लखनौने दिलेले 166 धावांचे आव्हान हैदरादाबादने फक्त 58 चेंडूमध्ये पूर्ण केले. केएल राहुल याच्या नेतृत्वातील लखनौ संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. हैदराबादकडून ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांना धावांचा पाऊस पाडला. हेड याने 30 चेंडूत 89 धावा काढल्या, यामध्ये आठ चौकार आणि आठ षटकार ठोकले. अभिषेक शर्मा यानेही वादळी फलंदाजी करत हैदराबादच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. यंदाच्या हंगामातील अभिषेक शर्माची फलंदाजी पाहून अनेकजण प्रभावित झाले आहेत. युवराज सिंह यानेही त्याचं कौतुक केलेय. त्याशिवाय इरफान पठाण, सिद्धू कौतुक करायला थकत नाहीत. आता हरभजन सिंह याने अभिषेक शर्माला विश्वचषकात संधी देण्याचा सल्ला दिला आहे. 


अभिषेक शर्मानं लौखनौच्या गोलंदाजांचा घामटा काढला - 


166 धावांचा पाठलाग करताना अभिषेक शर्माने वादळी फलंदाजी केली. शर्मापुढे लखनौच्या गोलंदाजांनी लोटांगण घातलं. अभिषेक शर्मा यानं 28 चेंडूमध्ये 75 धावांची ताबडतोड खेळी केली. अभिषेक शर्मा नाबाद राहिला. त्याने आपल्या खेलीमध्ये आठ चौकार आणि सहा षटकार ठोकले. अभिषेक शर्माने पहिल्यांदाच अशी विस्फोटक खेळी केली नाही. याआधीही त्याने आपलं आक्रमक रुप धारण करत हैदराबादसाठी धावांचा पाऊस पाडलाय.  


हरभजन सिंहकडून अभिषेक शर्मासाठी फिल्डिंग 


भारताचा माजी ऑफ स्पिनर हरभजन सिंह याने अभिषेक शर्माची फलंदाजी पाहून कौतुक केले. त्यानं ट्वीट करत त्याला टीम इंडियात संधी द्यायला हवी, असे म्हटलेय. भज्जीने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की,  "हैदराबादमध्ये धावांचा पाऊस पडला. ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी एक धाव काढतो, त्याप्रमाणे चौकार आणि षटकार ठोकले. 9.4 षटकात फक्त 166 धावांचा पाऊस पाडला. अभिषेक शर्माला टीम इंडियाच्या बेंच स्टेंथमध्ये समाविष्ट करायला हवं? " भज्जीची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. भज्जीने आपल्या पोस्टमध्ये बीसीसीआय आणि हैदराबाद संघाला टॅग केलेय. 


हैदराबादची गुणतालिकेत हनुमानउडी


लखनौ सुपर जायंट्सचा दारुण पराभव करत सनरायजर्स हैदराबाद संघाने गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. आता पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील सनरायजर्स हैदराबाद 14 गुणांसह प्लेऑफच्या शर्यतीत आघाडीवर आहे. हैदराबादला 12 सामन्यात 7 विजय आणि पाच पराभवाचा सामना करावा लागलाय.