Hardik Pandya Gujarat Titans vs Rajasthan Royals IPL 2022: राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टाइटन्स यांच्यामध्ये रविवारी आयपीएल 2022 ची फायनल होणार आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात संघाने आयपीएलच्या पदार्पणात दणक्यात कामगिरी केली आहे. दमदार कामगिरीच्या जोरावर गुजरातने फायनलमध्ये धडक मारली आहे. गुणतालिकेतही गुजरातचा संघ पहिल्या क्रमांकावर राहिलाय. आता रविवारी अटीतटीची लढत होण्याची शक्यता आहे. गुजरातसाठी जमेची बाजू म्हणजे, हार्दिक पांड्या आतापर्यंत फायनलमध्ये एकही सामना हरलेला नाही. आयपीएल 2022 च्या आधी गुजरात संघाने हार्दिक पांड्याला ड्राफ्टमध्ये घेतले होते. याआधी हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा भाग होता. मुंबई इंडियन्ससाठी हार्दिक पांड्याने मोक्याच्या सामन्यात दमदार कामगिरी केली आहे.  हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये आतापर्यंत चार फायनल सामने खेळले आहेत. 


हार्दिक पांड्याने आयपीएलमध्ये 2015 मध्ये पहिला फायनल सामना खेळला. या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 202 धावा केल्या होत्या. चेन्नईचा संघ 161 धावांत गारद झाला होता.  पांड्याने आयपीएलचा दुसरा फायनल 2017 मध्ये खेळला.. हा सामना पुणेबरोबर होता. हा सामना मुंबईने एका धावेनं जिंकला होता.  पांड्याने तिसरा फायनल सामना 2019 मध्ये खेळला. हा सामनाही मुंबईने अवघ्या एका धावेनं जिंकला होता.  मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 149 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तर दाखल चेन्नईचा संघ 148 धावांपर्यंत पोहचला होता. हार्दिक पांड्याने चौथा आयपीएल फायनल सामना दिल्लीच्या विरोधात खेळला होता. या सामन्यात मुंबईने बाजी मारली होती.  


यंदाच्या हंगामात हार्दिक पांड्याने जबरदस्त कामगिरी केली आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीत योगदान दिलेय. तसेच यशस्वी नेतृत्व केलेय. 14 सामन्यात हार्दिक पांड्याने 453 धावा केल्या आहेत.  यंदाच्या हंगामात पांड्याने चार अर्धशतकं झळकावली आहेत. गोलंदाजीतही पाच विकेट घेतल्या आहेत.  दरम्यान, हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात टायटन्स यंदा तुफान फॉर्मात आहे. पदार्पणाच्या हंगामात गुजरातने फायनलमध्ये धडक मारली.  गुजरात टायटन्सने (GT) साखळी सामन्यात दहा सामन्यात विजय मिळवत गुणतालिकेत अव्वल स्थान काबिज केले होते. तर चार सामन्यात गुजरातचा फक्त पराभव झाला होता. पहिल्या क्वालिफायर सामन्यात गुजरातने राजस्थान रॉयल्सचा पराभव करत फायनलमध्ये धडक मारली.