Harsha Bhogle IPL 2022 : आयपीएलच्या 15 व्या हंगामाचा रविवारी समारोप होणार आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडिअमवर हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरात आणि संजूच्या नेतृत्वातील राजस्थान यांच्या मेगा फायनल होणार आहे. फायनलच्या आधी प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांनी, आयपीएलसाठी भारतीय संघाची प्लेईंग 11 निवडली आहे. महत्वाचं म्हणजे, हर्षा भोगले यांच्या प्लेईंग 11 मध्ये रोहित शर्मा, विराट कोहली, एम एस धोनी, रविंद्र जाडेजा, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव आणि ऋषभ पंत, ईशान किशन यांचा समावेश नाही.
एका संकेतस्थळाच्या वृत्तानुसार, हर्षा भोगले यांनी सलामीसाठी केएल राहुल आणि राहुल त्रिपाठी यांची निवड केली आहे. राहुलने यंदाच्या हंगामात सहाशेपेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा चोपणाऱ्या फंलदाजामध्ये राहुल दुसऱ्या क्रमांकावर आहे. राहुल त्रिपाठीने 14 सामन्यात 413 धावा चोपल्या आहेत. राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन आणि मुंबई इंडियन्सचा सूर्यकुमार यादव यांनाही हर्षा भोगले यांनी प्लेईंग 11 मध्ये स्थान दिलेय. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याला हर्षा भोगले यांनी अष्टपैलू म्हणून संघात स्थान दिलेय.
दिनेश कार्तिककडे हर्षा भोगले यांनी विकेटकीपर फलंदाजाची भूमिका सोपवली आहे. तर फिरकीची जबाबदारी रविचंद्रन अश्विन आणि युजवेंद्र चहल यांच्याकडे दिली आहे. वेगवान गोलंदाजीत हर्षा भोगले यांनी हर्षल पटेल, मोहसिन खान, जसप्रीत बुमराह यांना संधी दिली आहे. हर्षा भोगले यांनी अनेक दिग्गजांना स्थान दिले नाही. यामध्ये धोनीपासून विराट आणि रोहित शर्माचा समावेश आहे.
हर्षा भोगले यांनी निवडलेली भारताची प्लेईंग 11 -
केएल राहुल, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, रविचंद्र अश्विन, युजवेंद्र चहल, हर्षल पटेल, मोहसिन खान आणि जसप्रीत बुमराह