IPL 2022 Final : आयपीएलच्या 15व्या मोसमाची मेगा फायनल रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. समारोपाच्या खास कार्यक्रमानंतर रात्री आठ वाजता सामन्याला सुरुवात होईल. यंदाच्या मोसमात नव्यानं दाखल झालेला गुजरात टायटन्स आणि 14 वर्षांनी फायनलमध्ये पोहोचलेली राजस्थान रॉयल्स यांच्यात फायनलचा हा थरार पाहायला मिळणार आहे.  


गुजरातच्या टायटन्सचा जल्लोष...की राजस्थानचा 'रॉयल मार्च?' यापैकी नक्की काय पाहायला मिळणार याची उत्सुकता जगभरातल्या तमाम आयपीएलचाहत्यांना आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर लाखो प्रेक्षकांच्या उपस्थितीत रंगणार आहे. आयपीएलच्या पंधराव्या मोसमाची मेगा फायनल आणि या मेगा फायनलमध्ये हार्दिक पंड्याची गुजरात टायटन्स आणि संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्स आमनेसामने आहेत. 


गुजरातचा संघ पदार्पणातच यंदाच्या मोसमातला सर्वात यशस्वी संघ ठरला. हार्दिक पंड्याचं नेतृत्व, डेव्हिड मिलरचा अनुभव, रशिद खानची जादूई फिरकी यासह संघातल्या प्रत्येक खेळाडूचं मोलाचं योगदान गुजरात टायटन्सला आयपीएलच्या फायनलमध्ये घेऊन गेलंय. गुजरातचा संघ आयपीएलच्या रणांगणात नवखा असला, तरी तो पदार्पणात सर्वात यशस्वी संघ ठरलाय. हार्दिक पंड्याच्या या फौजेनं साखळीत १४ पैकी १० सामने जिंकले. आणि मग क्वालिफायरची पायरी एकाच फटक्यात पार करुन सहजपणे फायनल गाठली. त्यामुळे फायनलमध्ये गुजरातचं पारडं जड मानलं जातंय.


इकडे संजू सॅमनसनच्या राजस्थानला अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी मोठा वळसा घालावा लागलाय. क्वालिफायरच्या पहिल्या सामन्यात त्यांचा गुजरातकडून पराभव झाला.पण राजस्थानची 'रॉयल' ब्रिगेड दुसऱ्या क्वालिफायरमध्ये नेटानं लढली. आणि बंगलोरला हरवून राजस्थाननं आपला 14 वर्षांचा वनवास संपवला. तुम्हाला आठवत असेल की 2008 सालच्या पहिल्यावहिल्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स हाच संघ विजेता ठरला होता. पण त्यानंतर राजस्थानला एकदाही विजेतेपद सोडा पण अंतिम फेरी गाठता आली नव्हती. त्यामुळं यंदा तब्बल १४ वर्षांनी राजस्थान फायनमध्ये खेळताना दिसणार आहे.


2008 साली राजस्थाननं आयपीएलचं विजेतेपद मिळवलं तेव्हा संघाचा कर्णधार होता... जगातला महान लेग स्पिनर शेन वॉर्न तोच वॉर्न आज या जगात नाहीय. राजस्थानसाठी कर्णधार, प्रशिक्षक, मेन्टॉर अशा अनेक भूमिका शेन वॉर्ननं बजावल्या होत्या. त्याच वॉर्नसाठी आपण यंदाचं आयपीएल खेळत असल्याची भावना कर्णधार संजू सॅमसननं रणांगणात उतरण्याआधी व्यक्त केली होती. 






 


स्पर्धेत चार शतकं ठोकणारा जॉस बटलर, कर्णधार म्हणून यशस्वी ठरलेला संजू सॅमसन, यशस्वी जैसवाल आणि देवदत्त पडिक्कल हे युवा शिलेदार आणि युजवेंद्र चहल, रवीचंद्रन अश्विन, ट्रेन्ट बोल्ट ही गोलंदाजांची फळी...यामुळे राजस्थान रॉयल्सची बाजूही मेगा फायनलमध्ये भक्कम वाटतेय... पण राजस्थान असो किंवा गुजरात टायटन्स ट्वेन्टी ट्वेन्टीच्या मैदानात ज्या दिवशी ज्याचा खेळ चांगला तोच ठरतो चॅम्पियन.