Who is Priyansh Arya : इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2025) पाचवा सामना अहमदाबादमध्ये गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्ज (Gujarat Titans VS Punjab Kings) यांच्यात खेळला जात आहे. गुजरात टायटन्सचा कर्णधार शुभमन गिलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात 24 वर्षीय भारतीय फलंदाज प्रियांश आर्यला (Priyansh Arya) पंजाब किंग्जकडून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. आयपीएल 2025 च्या पहिल्याच सामन्यात प्रियांशने त्याच्या फलंदाजीने खळबळ उडवून दिली.






डीपीएलमध्ये आर्यने 6 चेंडूत मारले 6 षटकार  


आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात पंजाब किंग्जने प्रियांश आर्यला 3.80 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. प्रियांश आर्यने दिल्ली प्रीमियर लीग (DPL) 2024 मध्ये खळबळ उडवून दिली होती. 2024 च्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्सविरुद्धच्या सामन्यात दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आर्यने एका षटकात सहा षटकार मारले होते. त्याच्या संघाने 20 षटकांत 308/5 असा विक्रमी धावांचा डोंगर उभारला. त्याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत फक्त 11 टी-20 सामने खेळले आहेत. यानंतर, मेगा लिलावात, पंजाब किंग्जने या फलंदाजाचा त्यांच्या संघात समावेश केला. आता प्रियांश आर्यने त्याच्या पदार्पणाच्या आयपीएल सामन्यात शानदार खेळी करून पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.


प्रियांश आर्यने कागिसो रबाडाला धू धू धुतले


गुजरात टायटन्स विरुद्धच्या या सामन्यात प्रभसिमरन सिंग आणि प्रियांश आर्य पंजाबकडून सलामीला आले. पण, प्रभसिमरन सिंग काही खास करू शकला नाही आणि 5 धावा करून बाद झाला. त्याला रबाडाने पॅव्हेलियनमध्ये पाठवले, पण त्यानंतर प्रियांश आर्यने काही शानदार फटके खेळले. यादरम्यान, त्याने कागिसो रबाडाला धू धू धुतले. पण, तो त्याच्या आयपीएल पदार्पणाच्या सामन्यात अर्धशतक झळकावू शकला नाही. प्रियांशला रशीद खानने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. प्रियांशने 23 चेंडूत 47 धावा काढल्या आणि बाद झाला, त्यादरम्यान त्याने 7 चौकार आणि 2 षटकार मारले.






उत्तर प्रदेशविरुद्ध 43 चेंडूत 102 धावा


प्रियांशने 23 नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर उत्तर प्रदेशविरुद्ध 43 चेंडूत 102 धावा करून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये दिल्लीच्या मोहिमेची सुरुवात केली. प्रियांशच्या खेळीत 10 षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. यूपी संघात भुवनेश्वर कुमार, शिवम मावी आणि पियुष चावलासारखे गोलंदाज होते. 2023-24 च्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आर्य दिल्लीसाठी सर्वाधिक धावा करणारा खेळाडू होता. त्याने सात डावांमध्ये 166.91 च्या स्ट्राईक रेटने 222 धावा केल्या.