GT vs LSG, IPL 2023 : हार्दिक पांड्याच्या नेतृत्वातील गुजरातने लखनौचा 56 धावांनी पराभव केलाय. गतविजेत्या गुजरातने प्लेऑफमधील आपले स्थान जवळपास निश्चित केलेय. गुजरातने ११ सामन्यात आठ विजय मिळवत १६ गुणांची कमाई केली आहे. हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या यांच्यातील ही लढत एकतर्फी झाली. २२८ धावांचा बचाव करताना गुजरातने लखनौला १७१ धावांत रोखले. मोहित शर्माने ४ विकेट घेत विजयात मोलाचे योगदान दिले. साहा आणि गिल यांच्या वादळी अर्धशतकानंतर मोहित शर्माने भेदक मारा केला. गुजरातने लखनौला आयपीएलमध्ये चौथ्यांदा पराभूत केलेय. गुजरातविरोधात लखनौला अद्याप एकही विजय मिळवता आलेला नाही. 


गुजरातने दिलेल्या २२८ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना लखनौच्या सलामी फलंदाजांनी वादळी सुरुवात केली. काइल मेयर्स आणि क्विंटन डि कॉक यांनी ८८ धावांची सलामी दिली.  या जोडीने पावरप्लेमध्ये ७२ धावांचा पाऊस पाडला होता. मोहित शर्माने ही जोडी फोडत लखनौला मोठा धक्का दिला. मोहित शर्माने ४८ धावांवर काइल मेयर्स याला बाद केले. या विकेटनंतर लखनौचा डाव गडगडला.. काइल मेयर्सने ३२ चेंडूत ४८ धावांची खेळी केली. यामध्ये दोन षटकार आणि सात चौकार लगावले आहेत. तर क्विंटन डिकॉक याने ७० धावांची खेळी केली. या खेळीत क्विंटन डिकॉक याने तीन षटकार आणि सात चौकारांच्या मदतीने ७० धावांचा पाऊस पाडला. 


क्विटन डिकॉक आणि काइल मेयर्स यांचा अपवाद वगळता एकाही फलंजाला लौकिकास साजेशी खेळी करता आली नाही. एकही फलंदाजाला तीस धावा करता आल्या नाही. दिपक हुड्डा ११, मार्कस स्टॉयनिस ४, निकोल पूरन ३, आयुष बडोनी २१ धावांवर बाद झाले. कर्णधार कृणाल पांड्याला खातेही उघडता आले नाही.  


गुजरातच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. सुरुवातीला गुजरातच्या गोलंदाजांना लय मिळाली नाही. लखनौच्या सलामी जोडीने गुजरातची गोंदाजी फोडून काढली होती. पण ही जोडी फुटल्यानंतर गुजरातच्या गोलदांजांनी अचूक टप्प्यावर मारा केला. ठरावीक अंतारावर विकेट घेतल्या. मोहित शर्माने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. मोहित शर्माने चार षटकात फक्त २९ धावा खऱ्च केल्या. नूर अहमद, राशिद खान आणि मोहम्मद शमी यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.


साहा-गिल यांची वादळी फलंदाजी, गुजरातचा 227 धावांचा डोंगर


GT vs LSG , IPL 2023 : वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल यांच्या वादळी फटकेबाजीच्या जोरावर गुजरातने निर्धारित 20 षटकात दोन विकेटच्या मोबदल्यात २२७ धावांपर्यंत मजल मारली. गिल आणि साहा यांनी १४२ धावांची सलामी दिली. गुजरातकडूनची ही आतापर्यंतची सर्वात मोठी भागिदारी होय.  


वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल या जोडीने गुजरातला वादळी सुरुवात करुन दिली. खासकरुन साहा ने लखनौच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. साहाने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी केली. शुभमन गिल याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली.. साहा फटकेबाजी करत असताना गिलने चांगली साथ दिली. साहा आणि गिल जोडीने १२ षटकात १४२ धावांची सलामी दिली. साहाने मौदानाच्या चारी बाजूने फटकेबाजी केली. साहा याने अवघ्या २० चेंडूत अर्धशतक झळकावले होते. गुजरातने पावरप्लेमध्ये ७८ धावांचा पाऊस पाडला होता. साहाने ४३ चेंडूत वादळी ८१ धावांची खेळी केली. या खेळीत साहाने चार षटकार आणि दहा चौकार लगावले. साहा आणि गिल यांनी लखनौच्य प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतला. 


साहा बाद झाल्यानंतर शुभमन गिल याने सामन्याची सुत्रे आपल्या हातात घेतली. शुभमन गिल याने मैदानाच्या चारी बाजूने फटकेबाजी केली. चौकारांपेक्षा षटकार जास्त लावत गिल याने धावांचा पाऊस पाडला. शुभमन गिल याला कर्णधार हार्दिक पांड्याने चांगली साथ दिली. पांड्याने १५ चेंडूत दोन षटकार आणि एका चौकारासह २५ धावांची खेळी केली. शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या यांनी दूसऱ्या विकेटसाठी २३ चेंडूत ४२ धावा चोपल्या. हार्दिक पांड्या बाद झाल्यानंतर शुभमन गिल याने मिलरच्या साथीने गुजरातच्या डावाला आकार दिला. शुभमन गिल याने ५१ चेंडूत नाबाद ९४ धावांची खेळी केली. या खेळीत गिल याने सात षटकार आणि दोन चौकार लगावले. गिल आणि मिलर यांनी तिसऱ्या विकेटसाठी २४ चेंडूत ४३ धावांची भागिदारी केली. डेविड मिलर याने १२ चेंडूत नाबाद २१ धावांची खेळी केली. या खेळीत मिलरने एक षटकार आणि दोन चौकर लगावले.



लखनौकडून एकाही गोलंदाजाला लौकिकास साजेशी गोलंदाजी करता आली नाही. लखनौने आठ गोलंदाजाचा वापर केला. पण एकाही गोलंदाजाला प्रभावी मारा करता आला नाही. मोहसीन खान आणि आवेश खान यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतल्या. इतर सहा गोलंदाजांची पाटी कोरीच राहिली.