GT Vs CSK: पुण्याच्या महाराष्ट्र असोसिएशन क्रिकेट स्टेडिअमवर खेळण्यात आलेल्या आयपीएल 2022 च्या 29 व्या सामन्यात गुजरात टायटन्सनं चेन्नई सुपर किंग्जवर 3 विकेट्सनं विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून गुजरात टायटन्सनं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या चेन्नईच्या संघानं 20 षटकात 4 विकेट्स गमावून 169 धावा केल्या. या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या गुजरातच्या संघाची सुरुवात खराब झाली. पण डेव्हिड मिलर आणि राशीद खान यांच्या वादळी खेळीच्या जोरावर गुजरातनं चेन्नईच्या तोंडातून विजयी घास हिसकावला आहे. 


नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या चेन्नईच्या संघाची सुरुवात खराब झाली. पावर प्लेमध्ये चेन्नईच्या संघानं रॉबिन उथप्पा आणि  मोईन अली यांच्या रुपात दोन विकेट्स गमावले. मात्र, त्यानंतर ऋतुराज गायकवाड आणि अंबाती रायडूंनी संघाचा डाव सावरला. या सामन्यात ऋतुराज गायकवाडनं 48 चेंडूत 73 धावा केल्या. ज्यात पाच षटकार आणि पाच चौकारांचा समावेश होता. तर, रायडूनं 31 चेंडूत 46 धावा केल्या. त्यानंही दोन षटकार आणि चार चौकार मारले. ऋतुराज आणि रायडू बाद झाल्यानंतर शिवम दुबे आणि  कर्णधार रवींद्र जाडेजानं शेवटच्या काही षटकात चांगली फटकेबाजी केली. ज्यामुळं चेन्नईच्या संघानं 20 षटकात चार विकेट्स गमावून 169 धावा केल्या. गुजरातकडून अल्झारी जोसेफनं सर्वाधिक दोन विकेट्स घेतले. तर, मोहम्मद शामी आणि यश दयाल यांनी प्रत्येकी दोन-दोन विकेट्स घेतल्या.

चेन्नईच्या संघानं दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरातच्या संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाचा सलामीवीर शुभमन गिल खाते न उघडताच बाद झाला. तो बाद झाल्यानंतर विजय शंकरही शून्यावर बाद झाला. त्यानंतर अभिनव मनोहरही फार काही करू शकला नाही आणि त्यानं 12 धावांवर तिची विकेट्स गमावली.त्यानंतर मिलरनं साहासोबत मिळून संघाची धावसंख्या पुढे नेण्याचा प्रयत्न केला. पण साहाही 11 धावा करून बाद झाला. 48 धावांत 4 विकेट्स गमावल्यानंतर राहुल तेवतिया आणि मिलरने संघाचा डाव सावरला. दोघांनी 39 धावांची भागीदारी केली.राहुल तेवतिया बाद झाल्यानंतर मिलर आणि रशीद खाननं अर्धशतकी भागीदारी करत सामना गुजरातच्या बाजूनं झुकवला. राशिदने अवघ्या 21 चेंडूत 40 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर मिलरनं आक्रमक फलंदाजी कायम ठेवत गुजरातला विजय मिळवून दिला.


हे देखील वाचा-