Hardik Pandya : आयपीएल (IPL 2022) स्पर्धेच्या यंदाच्या हंगामात नव्याने सामिल झालेल्या गुजरात टायटन्स संघाने (GT) उत्तम कामगिरी करत सर्वात आधी प्लेऑफमध्ये एन्ट्री मिळवली आहे. त्यांचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya) ज्याला एक उत्तम अष्टपैलू समजलं जात होतं, त्याने एक कर्णधार म्हणूननही स्वत:ला सिद्ध केलं आहे. दरम्यान पांड्याच्या याच नेतृत्त्वाच्या गुणांवर ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज खेळाडू ब्रॅड हॉग याने स्तुतीसुमनं उधळत त्याला थेट महान कर्णधार एमएस धोनीच्या पंगतीत नेऊन बसवलं आहे.  


'धोनीप्रमाणे शांत स्वभावाचा आहे पांड्या'


ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू ब्रॅड हॉग हार्दिकबाबत म्हणाला,''हार्दिक पांड्या कायम त्याच्या कर्णधार म्हणून घेतलेल्या निर्णयांनी प्रभावीत करतो. त्याचं नेतृत्त्व रोहित शर्मा आणि एमएस धोनीच्या कप्तानीची आठवण करुन देतो. हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून वावरताना त्याच्यात धोनीसारखे शांत स्वभावाने निर्णय घेण्याचे गुण दिसतात. तो धोनीप्रमाणेच कूल स्वभावाचा आहे. हार्दिकच्या याच शानदार नेतृत्त्वामुळे गुजरात टायटन्सने (GT) आतापर्यंत 13 पैकी 10 सामने जिंकत सर्वात आधी प्लेऑफममध्ये स्थान मिळवलं आहे. 


हार्दिक पांड्या आणि धोनीबद्दल पुढे बोलताना हॉग म्हणाला, ''दोघे शांत स्वभावाचे असून तणाव असताना दोघेही त्याचा शांतपणेच सामना करतात. दोघांची मानसिकता कायम साफ असते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी दोघेही त्यांचा संयम मोडू देत नाहीत. त्यांना माहित असतं सामना कोणत्या दिशेने जात आहे, त्यानुसार शांतपणे विचार करुन निर्णय घेत असतात.'' यंदा हार्दिक एक उत्तम कर्णधार म्हणून खेळत असून खेळाडू म्हणूनही चांगली कामगिरी करत आहे. गुजरात टायटन्सकडून (GT) खेळताना हार्दिक पांड्याने 11 सामन्यात 344 रन केले आहेत. यावेळी त्याची सरासरी 38.22 असून स्ट्राइक रेट 131.8 इतका आहे. तो गोलंदाजी देखील करत आहे.


हे देखील वाचा-