IPL 2022 : मुंबई नेमकी कुठे चुकली? सलग तीन पराभवाची पाच कारणे
IPL 2022 : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईची पंधराव्या हंगमाची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली आहे.
IPL 2022 : आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईची पंधराव्या हंगमाची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली आहे. मुंबईला सलग तीन वेळा पराभवाचा सामना करावा लागला आहे. पहिल्या दोन सामन्यात मुंबईचा निसटता पराभव झाला होता. मात्र अखेरच्या सामन्यात दारुण पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात कोलकाताने मुंबईवर पूर्णपणे वर्चस्व निर्माण केले होते. मुंबईने दिलेल्या 162 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कोलकात्याने पाच गडी आणि चार षटकं राखून केला. मुंबईच्या पराभवाची नेमकी कारण काय?
रोहितचा फ्लॉप शो -
मुंबईच्या पराभवाचं सर्वात मोठं कारण कर्णधार रोहित शर्मा हा आहे. पहिल्या सामन्यात रोहित शर्माने 41 धावांची खेळी केली होती. मात्र, त्यानंतर रोहित शर्माला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करता आली नाही. तीन सामन्यात रोहित शर्माला फक्त 64 धावा काढता आल्या. रोहित शर्माच्या खराब कामगिरीमुळे संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले.
फलंदाजीत सातत्य नाही -
ईशान किशन आणि तिलक वर्मा वगळता एकाही फलंदाजाला फलंदाजीत सातत्य राखता आले नाही. अनमोलप्रीत सिंह, टिम डेविड, कीरोन पोलार्ड आणि डेनियल सेम्स यांना आपल्या फलंदाजीत सातत्य राखता आले नाही. तिसऱ्या सामन्यात तर अनमोलप्रीत आणि टिम डेविड यांना अंतिम अकरामधून बाहेर ठेवावं लागलं.
संथ धावगती -
तिन्ही सामन्यात मुंबईच्या फलंदाजांनी संथ गतीने धावा काढल्या. फलंदाज वेगाने धावसंख्या काढण्याऐवजी खेळपट्टीवर स्थिरावण्याचा प्रयत्न करत होते. आतापर्यंत एकाही फलंदाजाला विस्फोटक फलंदाजी करता आली नाही. मुंबईची धावगती प्रत्येक सामन्यात संथ राहिली आहे. तिसऱ्या सामन्यात पावर प्लेमध्ये एक विकेट गमावूनही 45 धावाच करु शकले. पराभवाचं हे एक मोठं कारण आहे.
बुमराह रंगात नाही -
राजस्थान रॉयलविरोधातील अखेरचं षटक वगळलं तर आतापर्यंत बुमराहला आपल्या लौकिकास साजेशी गोलंदाजी करता आली नाही. बुमराहच्या गोलंदाजीत ती धार दिसत नव्हती. पहिल्या आणि तिसऱ्या सामन्यात बुमराहची विकेटची पाटी कोरीच राहिली होती. फक्त राजस्थानविरोधात बुमराहला तीन विकेट घेता आल्या. त्याशिवाय बुमराह फ्लॉप राहिलाय.
चौथ्या आणि पाचव्या गोलंदाजाची कमी -
मुंबईच्या पराभवाच्या मागे गोलंदाजीही मोठं कारण आहे. टायमल मिल्स आणि मुरुगन अश्विन चांगली गोलंदाजी करत आहेत. बुमराहची कामगिरी सरासरी आहे. पण मुंबईचा चौथा आणि पाचवा गोलंदाज धावा देत आहे. डेनियल सेम्स आणि पोलार्ड यांना धावा रोखण्यात अपयश मिळत आहे. मुंबईच्या पराभवाचं हेही महत्वाचं कारण आहे.