AB de Villiers On Dinesh Karthik: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघानं चांगली कामगिरी करून दाखवली आहे. फाफ डू प्लेसिसच्या नेतृत्वाखाली आरसीबीच्या संघानं सात पैकी पाच सामने जिंकले आहेत. आरसीबीच्या विजयात यष्टीरक्षक दिनेश कार्तिकनं मोलाचं योगदानं दिलं आहे. त्याची फलंदाजी पाहून आरसीबीचा माजी खेळाडू एबी डिव्हिलियर्स प्रभावित झाला आहे. कार्तिकला पाहून त्याला पुन्हा क्रिकेट खेळण्याची इच्छा झाली आहे, असं त्यानं एका स्पोर्ट्स यूट्यूब चॅनलवर बोलताना म्हटलं आहे.


आयपीएलमध्ये दिनेश कार्तिकची धमाकेदार फलंदाजी पाहून एबी डिव्हिलियर्स म्हणाला की, " दिनेश कार्तिकनं स्वबळावर आरसीबीच्या संघाला दोन-तीन सामने जिंकले आहेत. तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याचा फॉर्म कुठून आला? हे मला माहीत नाही. कारण, त्यानं यापूर्वी फारसे क्रिकेट खेळलेले नाही. तो मैदानात सर्व प्रकारचे शॉट खेळत आहेत. त्याची फलंदाजी पाहून मला पुन्हा मैदानात जाऊन क्रिकेट खेळण्याची इच्छा जागी झाली आहे. त्याला पाहून मी उत्साहित होत आहे. मधल्या फळीत तो मोठ्या दबावाखाली चांगली फलंदाजी करत आहे. तो अनुभवी आहे. जर त्यानं ही गती कायम ठेवली तर आरसीबीचा आयपीएलमधील प्रवास मोठा होऊ शकतो."


दिनेश कार्तिकची जबरदस्त कामगिरी
यंदाच्या आयपीएलमध्ये दिनेश कार्तिक उत्कृष्ट प्रदर्शन करत आहे. त्यानं या हंगामात 205.88 स्टाईक रेटनं 210 धावा केल्या आहेत. तो सात पैकी सहा सामन्यात नाबाद राहिला आहे. या हंगामात तो आरसीबीसाठी मॅचविनर खेळाडू ठरू शकतो.


आरसीबी गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर
यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करणारा आरसीबीचा संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आरसीबीनं आतापर्यंत सात सामने खेळले आहेत. त्यापैकी पाच सामन्यात आरसीबीनं विजय मिळवला आहे. तर, दोन सामन्यात पराभव स्वीकारला आहे. 


हे देखील वाचा-