मुंबई : अर्जुन सचिन तेंडुलकरचं आज (21 एप्रिल) आयपीएल पदार्पण होणार का याची उत्सुकला शिगेला पोहोचली आहे. कारण चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सने आज अर्जुन तेंडुलकरचा एक व्हिडीओ शेअर केला. या व्हिडीओमध्ये अर्जुनने टाकलेल्या यॉर्करवर मुंबईचा सलामीवीर इशान किशन बोल्ड झाला. हा व्हिडीओ संघाच्या सराव सत्राचा आहे. अर्जुनने देखील आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहेत.
लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यापूर्वीच मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अर्जुनचा एक फोटो शेअर केला होता. यानंतर कदाचित त्याला संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. मुंबईला मात्र फॅबियन अॅलनला पदार्पण करायला मिळाले आणि अर्जुनला आणखी वाट पाहावी लागीली.
फेब्रुवारीमध्ये झालेल्या आयपीएलच्या लिलावात इशान किशनला मुंबई इंडियन्सने 15.25 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलं होतं. यंदाच्या लिलावात तो सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. अर्जुनने या डावखुऱ्या फलंदाजाला चकवा देत त्याची विकेट घेतली. किशनला काही कळायच्या आताच अर्जुनने टाकलेला चेंडू ऑफस्टंपला लागला.
अर्जुन गेल्या काही काळापासून मुंबई इंडियन्स संघामध्ये आहे. मात्र, त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. या वर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबई इंडियन्सने 30 लाख रुपये देऊन त्याला संघात घेतलं होतं. आयपीएलच्या या मोसमात मुंबईच्या संघाने सहा सामने गमावले आहेत. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापन आज अर्जुनही खेळण्याची संधी देऊ शकतं. अर्जुन मुंबईच्या गोलंदाजीला धार देऊ शकतो. जसप्रीत बुमरा व्यतिरिक्त इतर कोणताही गोलंदाज यंदा मुंबईसाठी प्रभाव पाडू शकला नाही.
रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेणाऱ्या मुंबईचा सामना आज रवींद्र जडेजाच्या चेन्नई सुपर किंग्जशी होणार आहे. आयपीएलच्या या मोसमात चेन्नई संघाने सहा पैकी एक सामना जिंकला आहे. तर मुंबई संघाला अद्याप खातंही उघडता आलेलं नाही. आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सची कामगिरी फारच निराशाजनक झाली आहे. मुंबईने आतापर्यंत सर्व सहा सामने गमावले असून पॉईंट टेबलमध्ये त्यांचा सर्वात शेवटचा दहावा क्रमांक आहे. आज चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्सचा सामना आहे. हा सामना गमावला तर मुंबईचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात येऊ शकतं. मात्र तरीही अनेकांना अर्जुन सचिन तेंडुलकरच्या आयपीएल पदार्पणाची उत्सुकता आहे.
मुंबई इंडियन्स संघ : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रमणदीप सिंग, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग, डेवाल्ड ब्रेव्हीस, आर्यन जुयाल, इशान किशन, कायरन पोलार्ड, ऋतिक शौकीन, अर्जुन तेंडुलकर, संजय यादव, डॅनियल सॅम्स, टीम डेव्हिड, फॅबियन एलन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद अर्षद खान, जयदेव उनाडकट, मयंक मार्कंडे, जोफ्रा आर्चर, टायमल मिल्स, रिले मेरेडिथ, मुरुगन अश्विन, बसील थंपी