CSK vs KKR : आयपीएल 2020 च्या 49 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाईट रायडर्सचा 6 गडी राखून पराभव केला. या पराभवामुळे कोलकाताच्या प्ले-ऑफमध्ये पोहोचण्याची आशाही संपली आहे. त्याचबरोबर चेन्नईच्या विजयासह मुंबई इंडियन्सने प्ले ऑफसाठी पात्रता मिळविली आहे.


कोलकाताने प्रथम खेळताना 20 षटकांत पाच गडी गमावून 172 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात रुतुराज गायकवाडच्या शानदार अर्धशतक आणि रवींद्र जडेजाच्या तुफानी डावामुळे चेन्नईने अंतिम चेंडूवर लक्ष्य पूर्ण केलं.


तत्पूर्वी, कोलकाता नाईट रायडर्सकडून नितीश राणा आणि शुभमन गिल यांनी दोघांची डावाची सुरुवात केली. या दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 7.2 षटकांत 53 धावांची भागीदारी केली. गिल 17 चेंडूंत 26 धावा काढून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या सुनील नाराणयला सात चेंडूत केवळ सात धावा करता आल्या. त्याच्यानंतर रिंकू सिंगही 11 धावा करुन पॅव्हेलियनमध्ये परतला.


एकएक विकेट पडत असताना नितीश राणाने एका बाजून आपली आक्रमक खेळी चालू ठेवली होती. राणाने 61 चेंडूत 87 धावा केल्या. यात त्याने 10 चौकार आणि चार षटकार खेचले. तर कर्णधार इयोन मॉर्गनला 12 चेंडूत केवळ 15 धावा करता आल्या. अखेरीस दिनेश कार्तिक 10 चेंडूत 21 धावा करून नाबाद राहिला.


IPL 2020 : प्लेऑफमध्ये मुंबईची धडक, पॉईंट टेबलमध्येही अव्वल; ऑरेंज आणि पर्पल कॅपची स्थिती काय?


चेन्नई सुपर किंग्जकडून वेगवान गोलंदाज लुंगी नगीदीने त्याच्या कोट्याच्या चार षटकांत 34 धावा देऊन दोन बळी घेतले. याशिवाय मिशेल सँटनर, रवींद्र जडेजा आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.


यानंतर कोलकाता नाईट रायडर्सच्या 173 धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जच्या ऋतुराज गायकवाड आणि शेन वॉटसनने शानदार सुरुवात केली. या दोघांनीही पहिल्या विकेटसाठी 7.3 षटकांत 50 धावांची भागीदारी केली. वॉटसनने 19 चेंडूत 14 धावा केल्या आणि वरुण चक्रवर्तीच्या हाती झेलबाद झाला.


पहिला विकेट 50 धावांवर पडल्यानंतर गायकवाडने दुसर्‍या विकेटसाठी अंबाती रायुडूबरोबर 68 धावांची भागीदारी केली. रायुडूने 20 चेंडूत 38 धावांचे तुफानी खेळी केली. यादरम्यान त्याने पाच चौकार आणि एक षटकार लगावला. त्याचवेळी, ऋतुराज गायकवाडने 53 चेंडूत 72 धावांची डावांची खेळी केली. यात त्याने 6 चौकार आणि दोन षटकार लगावले.


रायडू आणि एमएस धोनीच्या पाठोपाठ बाद झाल्यामुळे कोलकाताने सामन्यात आपली पकड मजबूत केली होती, पण शेवटी रवींद्र जडेजाने 11 चेंडूत 31 धावांची तुफानी खेळी खेळत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. यावेळी, त्याचा स्ट्राइक रेट 281.82 होता. या डावात जडेजाने दोन चौकार व तीन षटकार लगावले. सॅम कुर्रान देखील 13 धावा करुन नाबाद परतला.


कोलकाताकडून वरुण चक्रवर्तीने शानदार गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकांत केवळ 20 धावा देऊन दोन बळी घेतले. याशिवाय पॅट कमिन्सनेही चार षटकांत 31 धावा देऊन दोन गडी बाद केले.