IPL Final, GT vs CSK : आयपीएलच्या (IPL 2023) अंतिम फेरीत चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि गुजरात टायटन्स (Gujrat Titans) हे संघ रविवारी आमनेसामने असतील. इंडियन प्रीमियर लीगच्या यंदाच्या सोळाव्या मोसमातील अंतिम सामना आज 28 मे रोजी रंगणार आहे. आयपीएल विजेतेपदाचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. संध्याकाळी 7.30 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. त्याआधी 7 वाजता नाणेफेक होईल.


गुजरात टायटन्सचा संघ क्वालिफायर-2 मध्ये मुंबई इंडियन्सचा पराभव करून अंतिम फेरीत पोहोचला आहे. हार्दिक पांड्याचा गुजराट संघ क्वालिफायर-1 मध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून पराभूत झाला होता. तर, यंदाच्या मोसमाच्या सलामी सामन्यात गुजरातने चेन्नईचा पराभव केला होता. आता यंदाच्या मोसमाच्या शेवटच्या सामन्यातही हे दोन संघ आमने-सामने उभे ठाकणार आहेत.


आजच्या सामन्यात गुजरात टायटन्सचा सलामीवीर शुभमन गिल अंतिम फेरीत गेम चेंजर ठरू शकतो. शुभमन गिलने या मोसमात सर्वाधिक धावा केल्या आहेत. यंदाच्या मोसमातील ऑरेंज कॅप शुभमन गिलच्या नावावर आहे. गिलने यंदाच्या मोसमात तीन वेळा शतकी खेळी केली आहे.


याशिवाय, गुजरात टायटन्सकडे गोलंदाजीत मोहम्मद शमी एक्स फॅक्टर आहे. त्याशिवाय, गुजरातचा फिरकीपटू राशिद खानने गोलंदाजीशिवाय फलंदाजीतही ताकद दाखवली आहे. या मोसमात राशिद खानने 16 सामन्यात 27 विकेट घेतल्या आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत राशिद मोहम्मद शमीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.


चेन्नई सुपर किंग्सचा सलामीवीर डेवॉन कॉनवेनं यंदाच्या मोसमात दमदार कामगिरी केली आहे. या मोसमात आतापर्यंत कॉनवेने 15 सामन्यात 625 धावा केल्या आहेत. ऑरेंज कॅपच्या शर्यतीत कॉनवे पाचव्या क्रमांकावर आहे. ऋतुराज गायकवाडसाठीही आयपीएल 2023 दमदार ठरला आहे. चेन्नई सुपर किंग्सच्या या सलामीवीराने 15 सामन्यात 564 धावा केल्या आहेत. ऋतुराज गायकवाड हा मोसमातील सर्वाधिक धावा करणारा सातवा खेळाडू आहे.


चेन्नई सुपर किंग्सची गोलंदाज महिषा पाथिरानानंही उत्कृष्ट गोलंदाजी दाखवली आहे. पथिरानानं डेथ ओव्हर्समध्ये चांगलीच छाप पाडली आहे. महिथा पाथिरानाने 11 सामन्यात 17 विकेट घेतल्या आहेत. याशिवाय तुषार देशपांडेनं मोक्याच्या वेळी विकेट काढत संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिला आहे.


चेन्नई विरुद्ध गुजरात महामुकाबला


आयपीएल 2023 च्या पहिल्या क्वालिफायर सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने गतविजेत्या गुजरात टायटन्सचा पराभव केला. गतविजेत्या गुजरात टायटन्स संघाला अंतिम सामन्यात चार वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान आहे. आयपीएल 2023 मधील 14 पैकी दहा सामने जिंकून गतविजेत्या गुजरात टायटन्सने (Gujrat Titans) आयपीएल 2023 गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावलं. तर चेन्नई सुपर किंग्स संघाने 14 सामन्यांपैकी आठ सामने जिंकून गुणतालिकेत दुसरं स्थान मिळवलं.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


IPL 2023 : 59 दिवस आणि 74 सामने; आज ठरणार महाविजेता, चेन्नई विरुद्ध गुजरात सामन्याकडे साऱ्यांचं लक्ष