CSK Vansh Bedi Ruled OUT of IPL 2025 : आयपीएल 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी खूपच खराब राहिली. एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 11 सामन्यांत 9 पराभवांसह चेन्नई पॉइंट टेबलमध्ये तळाशी आहेत. आता त्याचे फक्त 3 सामने बाकी आहेत. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा एक युवा 22 वर्षांचा विकेटकीपर खेळाडू दुखापतीमुळे उर्वरित हंगामातून बाहेर पडला आहे. चेन्नई सुपर किंग्जने या खेळाडूच्या बदलीची घोषणाही केली आहे. सीएसके संघाने अशा खेळाडूचा संघात समावेश केला आहे, ज्याने 28 चेंडूत शतक ठोकण्याचा पराक्रम केला आहे.

Continues below advertisement




28 चेंडूत शतक ठोकणाऱ्या तगड्या खेळाडूची CSKच्या ताफ्यात एन्ट्री


चेन्नई सुपर किंग्जचा युवा यष्टीरक्षक-फलंदाज वंश बेदी दुखापतीमुळे आयपीएल 2025 मधून बाहेर पडला आहे. डाव्या घोट्यातील लिगामेंट फाटल्यामुळे वंश बेदीला संघ सोडावा लागला. या हंगामात त्याला अजून खेळण्याची संधी मिळालेली नाही. त्याच्या जागी चेन्नई सुपर किंग्जने गुजरातकडून खेळणारा यष्टीरक्षक-फलंदाज उर्विल पटेलला त्यांच्या संघात समाविष्ट केले. उर्विलने 2024-25 च्या भारतातील देशांतर्गत टी-20 स्पर्धेत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये शानदार कामगिरी केली होती आणि सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.




उर्विल पटेल हा तोच खेळाडू आहे, ज्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये इंदूरमध्ये त्रिपुराविरुद्ध 28 चेंडूत शतक ठोकले आणि टी-20 मध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय फलंदाज बनला. पण त्याआधी आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात उर्विल पटेल विकला गेला नाही. तो भारतासाठी लिस्ट ए मध्ये सर्वात जलद शतक करणारा खेळाडू देखील आहे. 2023 मध्ये विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने अरुणाचल प्रदेशविरुद्ध 41 चेंडूत शतक झळकावले होते. उर्विल पटेलने आतापर्यंत 47 टी-20 सामन्यांमध्ये 26 च्या सरासरीने 1162 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 4 अर्धशतके आणि 2 शतके आहेत. त्याने 170.38 च्या स्ट्राईक रेटने हे धावा केल्या आहेत.


चेन्नई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर 


चेन्नईने उर्विल पटेलला त्याच्या 30 लाख रुपयांच्या बेस प्राइसवर संघात सामील केले आहे. सीएसकेच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल बोलायचे झाले तर, 11 सामन्यांपैकी फक्त दोन विजयांसह ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडले आहे. संघाला उर्वरित सामन्यांमध्ये कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सचा सामना करावा लागणार आहे.


हे ही वाचा -


ICC Latest Rankings 2025 : आयपीएलच्या धुमधडाक्यात आयसीसीकडून मोठी घोषणा, रँकिंगमध्ये टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानची काय आहे अवस्था?