Chennai Super Kings vs Sunrisers Hyderabad: एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्सने शारजा येथे खेळलेल्या आयपीएल 2021 च्या 44 व्या सामन्यात केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील सनरायझर्स हैदराबादचा सहा गडी राखून पराभव केला. पहिल्यांदा खेळताना हैदराबादने 20 षटकांत सात गडी बाद 134 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल चेन्नईने चार गडी गमावून शेवटच्या षटकात लक्ष्याचा पाठलाग केला. ऋतुराज गायकवाडने चेन्नई सुपर किंग्जसाठी सर्वाधिक 45 धावा केल्या. दुसरीकडे फाफ डू प्लेसिसने 41 धावांची खेळी खेळली. मात्र, शेवटी कर्णधार एमएस धोनीने षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिला. यूएईमध्ये खेळल्या जाणाऱ्या उत्तरार्धात चेन्नईचा हा सलग चौथा विजय आहे. त्याचबरोबर चेन्नईचा या मोसमात 11 सामन्यांत एकूण 9 वा विजय आहे. यासह, त्यांनी प्लेऑफसाठी तिकीट मिळवले आहे.


हैदराबादकडून 135 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फाफ डु प्लेसिस आणि ऋतुराज गायकवाड यांनी चेन्नई सुपर किंग्जला शानदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 10.1 षटकांत 75 धावांची भागीदारी केली. मात्र, ऋतुराज आपले अर्धशतक पूर्ण करू शकला नाही आणि 45 धावांवर जेसन होल्डरच्या हाती झेलबाद झाला. त्याने आपल्या डावात चार चौकार आणि दोन षटकार मारले.


यानंतर मोईन अली आणि फाफ यांच्यात दुसऱ्या विकेटसाठी 28 धावांची भागीदारी झाली. पण अली 17 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने 17 धावा करून बाद झाला. राशिद खानने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर जेसन होल्डरने सुरेश रैनाला (02) बाद करून सामन्यात आपल्या संघाला पुनरागमन करण्यासाठी प्रयत्न केला. यानंतर थोड्याच वेळाने फाफही 41 धावा करून बाद झाला. त्याने आपल्या डावात तीन चौकार आणि दोन षटकार मारले.


AUS-W vs IND-W | भारतीय महिला क्रिकेटमध्ये 'गुलाबी क्रांती'!


यावेळी हैदराबाद संघ सामन्यात पुनरागमन करेल असे वाटत होते. पण अंबाती रायुडू आणि एमएस धोनीने त्यांच्या आशेवर पाणी फेरले. धोनी 11 चेंडूत 14 आणि रायडू 13 चेंडूत 17 धावांवर नाबाद परतला. दोघांनीही आपल्या डावात एक चौकार आणि एक षटकार ठोकला. मात्र, मनोरंजक गोष्ट म्हणजे धोनीने आपल्या जुन्या शैलीत षटकार ठोकून सामना जिंकला. त्याचवेळी सनरायझर्स हैदराबादकडून जेसन होल्डरने 27 धावांत तीन बळी घेतले. याशिवाय रशीद खानला एक यश मिळाले.



हैदराबादच्या 134 धावा 
तत्पूर्वी, नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादची चांगली सुरुवात झाली नाही. शेवटच्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा सलामीवीर जेसन रॉय अवघ्या दोन धावांवर बाद झाला. यानंतर कर्णधार केन विल्यमसननेही 11 चेंडूत 11 धावा केल्या. रॉयला हेझलवूडने आणि विल्यमसनला ब्राव्होने बाद केले.


43 धावांवर दोन विकेट पडल्यानंतर युवा प्रियम गर्ग चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. पण त्यालाही अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही आणि त्याने 10 चेंडूत सात धावा केल्या. ब्राव्होने त्यालाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर काही वेळातच रिद्धीमान साहाही बाद झाला. त्याने 46 चेंडूत 44 धावा केल्या. साहाने आपल्या डावात एक चौकार आणि दोन षटकार ठोकले.


74 धावांवर गडी बाद झाल्यानंतर अब्दुल समद आणि अभिषेक शर्मा यांनी हैदराबादचा डाव पुढे नेला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 34 धावांची भागीदारी केली. अभिषेक मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात 18 धावांवर बाद झाला. त्याने एकूण 13 चेंडूंचा सामना केला आणि या दरम्यान त्याने एक चौकार आणि एक षटकार ठोकला. यानंतर समदही 14 चेंडूत 18 धावा करून बाद झाला. त्यानेही एक चौकार आणि एक षटकारही मारला.


सरतेशेवटी, राशिद खानने 13 चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने नाबाद 17 धावा केल्या आणि संघाची धावसंख्या 130 च्या पुढे नेली. त्याचवेळी जेसन होल्डर पाच धावा काढून बाद झाला. दुसरीकडे, भवनेश्वर कुमार दोन धावांवर नाबाद परतला.


त्याचबरोबर वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने चेन्नई सुपर किंग्जसाठी अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने आपल्या चार षटकांत फक्त 24 धावा देऊन तीन बळी घेतले. याशिवाय ब्राव्होने चार षटकांच्या कोट्यात अवघ्या 17 धावा देऊन दोन बळी घेतले. तसेच शार्दुल ठाकूर आणि रवींद्र जडेजा यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.