Suryakumar Yadav Reacts After Ayush Mhatre : आरसीबी आणि सीएसके यांच्यातील सामन्यादरम्यान 17 वर्षीय आयुष म्हात्रेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्जच्या या सलामीवीराने ज्या पद्धतीने फलंदाजी केली ते पाहून सर्वजण थक्क झाले. आरसीबीचा वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारच्या एका षटकात त्याने फक्त चौकार आणि षटकार मारले आणि 26 धावा केल्या. जरी तो फक्त 6 धावांनी शतक हुकला असला तरी त्याने आपल्या शानदार फलंदाजीने अनेकांची मने जिंकली. या सीएसके सलामीवीराची फलंदाजी पाहिल्यानंतर टीम इंडियाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव देखील त्याचे कौतुक करण्यापासून स्वतःला रोखू शकला नाही.
सूर्यकुमार यादव याने केले आयुष म्हात्रेचे कौतुक
चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर आयुष म्हात्रेने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध 48 चेंडूत 5 षटकार आणि 9 चौकारांच्या मदतीने 94 धावा केल्या. तो 6 धावांनी शतक हुकले, पण त्याने आयपीएलमधील पहिले अर्धशतक झळकावले. जोपर्यंत आयुष क्रीजवर होता तोपर्यंत सीएसकेच्या जिंकण्याची शक्यता खूप जास्त होती, पण तो आऊट होताच संघ डगमगला आणि सामना 2 धावांनी गमावला.
आयुष म्हात्रेची चमकदार फलंदाजी पाहून मुंबई इंडियन्सचा फलंदाज सूर्यकुमार यादव त्याच्यावर प्रभावित झाला. “शौर्यपूर्ण आणि फायर खेळी! भविष्य इथे आहे. नाव लक्षात ठेवा”, अशी पोस्ट सूर्याने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर केली आहे. सूर्याने आयुषला भारतीय क्रिकेटचे भविष्य म्हटले आहे.
ऋतुराज गायकवाडच्या जागी आयुषला चेन्नई संघात स्थान मिळाले. त्याने आतापर्यंत 4 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 40.75 च्या सरासरीने 163 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये एका अर्धशतकाचा समावेश आहे.
आयुष म्हात्रेने मुंबई इंडियन्सविरुद्ध आयपीएलमध्ये पदार्पण केले. या सामन्यात त्याने 15 चेंडूत 32 धावांची शानदार खेळी खेळली होती. या सामन्यानंतर सूर्यकुमार यादवने आयुषचे कौतुक केले होते. सूर्यकुमार यादव म्हणाला होता की, मी गेल्या दोन वर्षांपासून आयुषला खूप जवळून पाहत आहे. त्याने मुंबईसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप चांगली कामगिरी केली आहे. त्याने त्याच्या पहिल्या आयपीएल सामन्यात ज्या पद्धतीने फलंदाजी केली ती कौतुकास्पद आहे, जर तो या प्रामाणिकपणाने खेळत राहिला तर तो खूप पुढे जाईल.