Arjun Tendulkar First Wicket in IPL : आयपीएल 2023 (IPL 2023) च्या 25 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) सनरायजर्स हैदराबादवर (Sunrisers Hyderabad) 14 धावांनी विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई संघाने सलग तिसऱ्या सामन्यात विजय मिळवत हॅटट्रिक पूर्ण केली आहे. अटीतटीच्या या सामन्यात मुंबईने शेवटच्या षटकात हैदराबादवर विजय मिळवला. दरम्यान, हा सामना मुंबईचा मेंटर आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याचा मुलगा अर्जुनसाठी फारच अविस्मरणीय ठरला आहे. सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडूलकरने त्याच्या इंडियन प्रीमियर लीगच्या कारकिर्दीतील पहिला गडी बाद केला आहे. शेवटच्या षटकात गोलंदाजी करताना अर्जुनने आयपीएलमधील त्याची पहिली विकेट घेतली आहे. त्यामुळे हा सामना सचिन तेंडुलकर आणि त्याचा मुलगा अर्जुनसाठी अतिशय खास ठरला आहे.


सचिन तेंडुलकरच्या 'लेका'ची दमदार कामगिरी


सनरायझर्स हैदराबाद संघाला शेवटच्या षटकात 20 धावांची गरज होती. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने युवा गोलंदाज अर्जुन तेंडुलकरला गोलंदाजीची संधी दिली. अर्जुनने कर्णधार रोहित शर्माचा विश्वास सार्थ ठरवत शेवटच्या षटकात अवघ्या चार धावा दिल्या आणि एक बळी घेतला. अर्जुनच्या षटकात दोन विकेटही पडल्या. अब्दुल समद दुसऱ्या चेंडूवर धावबाद झाला. अर्जुन तेंडुलकरच्या पाचव्या चेंडूवर भुवनेश्वर कुमारला रोहित शर्माने झेलबाद केलं आणि सनरायझर्स हैदराबादचा डाव आटोपला. अर्जुन तेंडुलकरने 2.5 षटकात 18 धावा दिल्या. अर्जुन तेंडुलकरने आयपीलएच्या दुसऱ्या सामन्यात त्याच्य आयपीएल कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली.


अर्जुन तेंडुलकरची आयपीलच्या कारकिर्दीतील पहिला विकेट






अर्जुन तेंडुलकरचं आयपीएलमध्ये पदार्पण


आयपीएलच्या 16 व्या हंगामात मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) आयपीएलमध्ये (IPL 2023) पदार्पण केलं. दीर्घ प्रतिक्षेनंतर अर्जुनालाही संधी मिळाली. कोलकाता विरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सकडून अर्जुन तेंडुलकरने आयपीएलमध्ये पदार्पण केलं. अर्जुन तीन वर्षांपासून संघाचा भाग आहे. मागील दोन वर्ष तो बेंचवर होता. पण दीर्घ प्रतिक्षेनंतर यंदाच्या वर्षी त्याला मुंबईकडून आयपीएल खेळण्याची संधी मिळाली. आपल्या पहिल्या आयपीएल सामन्यात अर्जुनने दोन षटकांच्या गोलंदाजीमध्ये 17 धावा दिल्या पण त्याला एकही विकेट घेता आली नाही. दुसऱ्या सामन्यात मात्र त्याने एक गडी बाद केला.






मुंबईकडून हैदराबादचा 14 धावांनी पराभव


इंडियन प्रीमियर लीगमध्ये 18 एप्रिलला झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादचा त्यांच्या घरच्या मैदानावर 14 धावांनी पराभव केला. अत्यंत रोमांचक सामन्यात हैदराबादला विजयासाठी शेवटच्या 12 चेंडूत 24 धावांची गरज होती. एकोणीसाव्या षटकात कॅमेरॉन ग्रीनने उत्तम गोलंदाजी करत हैदराबादला फक्त चार धावा दिल्या. त्यानंतर शेवटच्या षटकात अर्जुन तेंडुलकरने दमदार गोलंदाजी करत आपल्या संघाला 14 धावांनी विजय मिळवून दिला. अर्जुनने शेवटच्या षटकात एक गडी बाद केला.