MI vs LGS, IPL 2023 Eliminator : इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2023) यंदाच्या सोळाव्या मोसमात एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) लखनौ सुपर जायंट्सचा (Lucknow Super Giants) 81 धावांनी पराभव केला. या विजयासह मुंबई इंडियन्सने (MI) आयपीएल 2023 क्वालिफायर 2 (IPL 2023 Qualifaier 2) मध्ये स्थान मिळवलं आहे. आकाश मधवाल मुंबई इंडियन्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला. आकाश मधवालने पाच धावा देऊन पाच बळी घेत संघाला विजय मिळवून दिला. आकाश मधवालने या सामन्यानंतर ऐतिहासिक खेळी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली आहे.
मुंबईच्या युवा फलंदाजाची ऐतिहासिक कामगिरी!
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मुंबईने 20 षटकांत 8 गडी गमावून 182 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना लखनौचा संघ 16.3 षटकांत 101 धावांत सर्वबाद झाला. मुंबईचा वेगवान गोलंदाज आकाश मधवालने लखनौ संघाचा पराभव करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
लखनौ विरोधात भेदक मारा, अनेक विक्रमांना गवसणी
मुंबईचा वेगवान गोलंदाज आकाश मधवालने 3.3 षटकात केवळ 5 धावा देत पाच बळी घेतले. या भेदम गोलंदाजीसह आकाश मधवानने इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासातील अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. आकाशने लखनौ सुपर जायंट्सच्या प्रेरक मंकड, आयुष बडोनी, निकोलस पुरन, रवी बिश्नोई आणि मोहिसन खान यांना तंबून परत पाठवलं. याशिवाय लखनौचा एक गडी धावबाद करूनही त्यानं मुंबई इंडियन्सच्या संघासाठी योगदान दिलं.
आयपीएलमधील 'हे' विक्रम आकाश मधवालच्या नावावर
- इंडियन प्रीमियर लीगच्या प्लेऑफ सामन्यांमध्ये पाच विकेट्स घेणारा आकाश हा पहिला गोलंदाज ठरला आहे.
- आयपीएलच्या एका डावात सर्वोत्तम गोलंदाजी करणारा अनिल कुंबळेनंतरचा दुसरा गोलंदाज ठरला. आकाशने 3.3 षटकात 5 धावा देऊन 5 बळी घेतले. याआधी अनिल कुंबळेने 3.1 षटकात 5 धावा देऊन 5 बळी घेतले.
- चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर म्हणजेच चेपॉक मैदानावर सर्वोत्तम टी 20 गोलंदाजी करणारा खेळाडू ठरला आहे.
- आयपीएलच्या इतिहासातील आकाश मधवाल सर्वात कमी इकॉनॉमी रेटने 5 विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे. लखनौविरुद्ध खेळल्या गेलेल्या एलिमिनेटर सामन्यात आकाशने 3.3 षटकात केवळ 1.40 धावा देत 5 बळी घेतले.
- आकाश मधवाल आयपीएलच्या इतिहासातील संयुक्त चौथा सर्वोत्तम गोलंदाज ठरला आहे. आयपीएलमधील सर्वोत्तम गोलंदाजीचा विक्रम अल्झारी जोसेफच्या नावावर आहे. जोसेफने गुजरात टायटन्सकडून खेळताना सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्यात 3.4 षटकात 12 धावा देत 6 गडी बाद केले होते.