IPL 2024 : आयपीएलच्या 17 व्या हंगामाला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. चेन्नई आणि आरसीबी यांच्यामध्ये सलामीचा सामना होणार आहे. दहा संघामध्ये चषकासाठी लढत होणार आहे. आरसीबीला आतापर्यंत चषक जिंकता आला नाही, त्यामुळे प्रत्येकवेळी ट्रोल केले जाते. पण फक्त आरसीबीच नाही तर आणखी तीन संघालाही आयपीएल चषकावर नाव कोरता आलं नाही. 


2008 मध्ये आयपीएलच्या रनसंग्रामाला सुरुवात झाली. पहिल्याच हंगामात राजस्थान रॉयल्सने चषक उंचावला. मागील 16 वर्षात चेन्नई आणि मुंबईने प्रत्येकी पाच पाच वेळा चषक उंचवलाय. कोलकाता आणि सनरायजर्स हैदराबाद यांनी प्रत्येकी दोन दोन वेळा चषकावर नाव कोरलेय. पण मागील 16 वर्षांमध्ये काही संघांना चषक उंचावता आला नाही. फायनलमध्ये धडक मारली पण चषक जिंकू शकले नाहीत. आरसीबी, पंजाब, लखनौ आणि दिल्ली या संघाला आतापर्यंत आयपीएल चषक उंचावता आला नाही.


1. आरसीबी - 


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (RCB) संघ 2008 पासून आयपीएलमधील सदस्य आहे. विराट कोहलीसह सात जणांनी या संघाची धुरा संभाळली, पण चषक जिंकता आला नाही. आरसीबीनं तीन वेळा आयपीएलच्या फायनलमध्ये धडक मारली, पण पदरी निराशाच पडली.   2009, 2011 आणि 2016 मध्ये आरसीबीने फायनलमध्ये धडक मारली, पण चषक जिंकता आला नाही. सर्वाधिक वेळा चषक न जिंकता फायनल खेळणाऱ्या संघात आरसीबी पहिल्या क्रमांकावर आहे. 2022 मध्ये आरसीबीने प्लेऑफमध्ये स्थान पटकावलं होतं. पण क्वालिफायर सामन्यात राजस्थान संघाने आरसीबीचं आव्हान संपुष्टात आणलं होतं. यंदा तरी आरसीबीचं चषक विजयाचं स्वप्न साकार होतेय का? याकडे चाहते अतुरतेने वाट पाहत आहेत.  


2. पंजाब किंग्स


16 हंगामात पंजाब किंग्स संघाचं नेतृत्व तब्बल 15 खेळाडूंनी केलेय. युवराज सिंह, कुमार संगाकारा आणि एडम गिलख्रिस्ट यांच्यासारख्या दिग्गजांनी नेतृत्व करुनही पंजाबला चषक उंचावता आला नाही. पंजाबनं एकवेळा फायनलमध्ये धडक मारली होती. 2014 मध्ये पंजाबनं फायनलमध्ये धडक मारली, पण कोलकात्यानं बाजी मारत चषक उंचावला होता.  2014 नंतर पंजाबची कामगिरी निराशाजनकच राहिली आहे. पंजाबला प्लेऑफमध्येही पोहचता आले नाही. 2008 मध्ये पंजाबनं प्लेऑफमध्ये स्थान पटकावलं होतं.  पंजाब संघाला सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही. 


3. दिल्ली कॅपिटल्स


दिल्ली कॅपिटल्सला आपल्या कामगिरीत सातत्य ठेवता आलं नाही. 2008 मध्ये वीरेंद्र सहवाग यानं नेतृत्व केले होते. त्यावेळी दिल्लीने प्लेऑफमध्ये स्थान पटकावलं होतं. दिल्लीने मागील 16 वर्षांमध्ये फक्त एकवेळा फायनलपर्यंत धडक मारली. 2020 मध्ये श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीने फायनलमध्ये धडक मारली होती. पण रोहित शर्माच्या नेतृत्वातील मुंबई इंडियन्सने खिताब पटकावला होता. 2021 मध्ये दिल्लीने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला होता, पण आतापर्यंत त्यांना चषक जिंकता आला नाही. यंदातरी दिल्ली चषक उंचावणार का?


4. लखनौ सुपर जायंट्स 


लखनौ सुपर जायंट्स संघ 2022 पासून आयपीएलचा भाग आहे. 2022 मध्येच लखनौने चषकासाठी दावेदारी दाखवली होती. 2022, 2023 या दोन्ही वर्षी लखनौने प्लेऑफमध्ये स्थान पटकावलेय. एलिमिनेटरच्या पुढे लखनौला जाता आले नाही. यंदा लखनौचा संघ कशी कामगिरी करतो? याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.