मुंबई : भारतीय महिला क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक तुषार आरोठेला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. आयपीएल सामन्यांच्या बेटिंग प्रकरणात बडोदा पोलिसांनी आरोठेला अटक केली आहे. तुषार आरोठे हा बडोद्याचा माजी रणजीपटू आहे.

52 वर्षीय तुषार आरोठे प्रथम दर्जाच्या 114 सामन्यांमध्ये खेळला आहे. एप्रिल 2017 ते जून 2018 या कालावधीत तो भारतीय महिला क्रिकेट संघाचा प्रशिक्षक होता. 2017 मधील महिला विश्वचषक आणि आशिया चषकाच्या अंतिम फेरीत सहभागी झालेल्या संघाचा तो कोच होता.

अलकापुरी परिसरातल्या एका कॅफेवर बडोदा पोलिसांनी काल रात्री धाड टाकली. तिथे पंजाब आणि दिल्ली संघांमधल्या सामन्याचं थेट प्रक्षेपण सुरु असल्याचं आढळून आलं. त्यावेळी या सामन्यावर ऑनलाईन बेटिंगही घेण्यात येत होतं.

या प्रकरणात पोलिसांनी तिथल्या साधनसामुग्रीसह 19 जणांना ताब्यात घेतलं. त्यात बडोद्याचा माजी रणजीपटू आणि भारताच्या महिला क्रिकेट संघाचा माजी प्रशिक्षक तुषार आरोठेचाही समावेश आहे. पोलिसांनी घटनास्थळाहून 21 मोबाईल, प्रोजेक्टर, नऊ वाहनं आणि सुमारे 14 लाख रुपये जप्त केले आहेत.