सांगली : राज्यात गेल्या 2 दिवसांपासून अनेक ठिकाणी गारपीट आणि अवकाळी पाऊस पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. याबाबत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी कृषी विभागाच्या माध्यमातून सर्व जिल्हा कृषी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे. काही ठिकाणी पंचनामे देखील सुरू झाले आहेत. पंचनाम्यांचा अहवाल लवकरच येईल. तो आल्यानंतर येत्या अधिवेशनात शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याबाबत निर्णय घेतले जातील, अशी माहिती कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी दिली आहे.

Continues below advertisement


गेल्या वर्षीही अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यावेळी राज्य सरकारने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 10 हजार कोटींची मदत जाहीर केली होती. यातील साडे पाच हजार कोटी शेतीसाठी वितरित करण्यात आले आहेत. तर उर्वरित सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ऊर्जा विभागाला देण्यात आले. त्यामुळे नुकसानीचा अहवाल आल्यावर निश्चित मदत करण्याबाबतची भूमिका सरकारकडून घेतली जाईल, असं मंत्री विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केलं आहे.


राज्यभरात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा तडाखा, शेतकरी हवालदिल


राज्यात पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला अवकाळी पावसानं झोडपलं आहे. नांदेड, लातूर, सातारा, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, अकोला, परभणी, भंडारा या जिल्ह्यांसह अनेक भागांमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळं ज्वारी, गहू, केळी, भुईमूग, हरभरा पिकांसह द्राक्ष पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी संकटात आला आहे.