IPL  2022  : बहुप्रतिक्षीत इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या सामन्यांना आता अवघे काही दिवस शिल्लक आहेत. 26 मार्चपासून सामन्यांना मुंबईत सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या चाहत्यांमध्ये खूप उत्साह आहे. बीसीसीआयने कालच आयपीएल सामन्याचं वेळापत्रक जाहीर केले आहे.  आयपीएलचा पहिला चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्समध्ये वानखेडे मैदानावर होणार आहे.  संपूर्ण आयपीएलचं वेळापत्रक जाहीर झालं असून सर्व सामने मुंबई, नवी मुंबई आणि पुणे या ठिकाणी होणार आहेत. 


आयपीएलचा जोर सगळीकडे वाढू लागला असताना दुसरीकडे याचं प्रमोशन देखील जोरात होत आहे. आयपीएल 2022 च्या नवनवीन प्रोमो सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. यात महेंद्रसिंह धोनी अनोख्या अवतारात दिसून येत आहे. आयपीएलच्या या वर्षीच्या सीझनची मोहीम #YeAbNormalHai ही आहे. पहिल्या प्रोमोमध्ये MS धोनी बस ड्रायव्हर म्हणून दाखवण्यात आला होता. यात 'ये पागलपन अब नॉर्मल है' असं म्हणत धोनी रजनीकांत स्टाईलमध्ये दिसला होता. यानंतर आता धोनी पुन्हा हटके लूकमध्ये दिसून आला आहे. आयपीएलनं हा प्रोमोचा व्हिडीओ शेअर केला आहे. 






आता धोनी आजोबाच्या रुपात, म्हणाला, ऐसी बहानेबाजी अब नॉर्मल है...


आता धोनीचा नवीन प्रोमो आला आहे. यामध्ये एमएस धोनी एक म्हातारा माणूस दाखवण्यात आला आहे. ज्याला तो आयपीएल सामना पाहत असताना कोणाचा तरी फोन येतो. मात्र तो मॅच पाहत असल्यानं फोन रिसिव्ह करत नाही आणि  आपल्या मुलीला फोन उचलण्याचा इशारा करत 'तो मरण पावला आहे' असं सांगायला लावतो. यानंतर ती मुलगी मोठ्यानं ओरडते आणि शेवटी "ऐसी बहानेबाजी अब नॉर्मल है," असं म्हणत आयपीएलचा प्रोमो संपतो.  


धोनीचा हा भन्नाट लूक पाहून चाहत्यांच्या प्रतिक्रियांचा पाऊस सुरु झाला आहे. माहीचा हा कधीही न पाहिलेला अवतार आणि अभिनय पाहून त्याचे कौतुक होत आहे.